प्रसुतीदरम्यान महिलेचा मृत्यू

By Admin | Published: May 20, 2014 11:51 PM2014-05-20T23:51:40+5:302014-05-21T00:17:52+5:30

उस्मानाबाद : जिल्हा रूग्णालयात प्रसुतीसाठी दाखल महिलेचा बाळंतपणानंतर मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली़

Female deaths during delivery | प्रसुतीदरम्यान महिलेचा मृत्यू

प्रसुतीदरम्यान महिलेचा मृत्यू

googlenewsNext

उस्मानाबाद : जिल्हा रूग्णालयात प्रसुतीसाठी दाखल महिलेचा बाळंतपणानंतर मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली़ मयताच्या नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोप करीत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली़ दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता महिलेचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यात आले़ मिळालेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यातील मोहा येथील वंदना अशोक मडके (वय-३०) ही महिला बाळंतपणासाठी माहेरी (सापनाई) गेली होती़ सोमवारी वंदना यांना त्रास होऊ लागल्याने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मंगळवारी पहाटेच्या दरम्यान वंदना यांची प्रसुती झाली़ मात्र, काही मिनिटात त्यांचा मृत्यू झाला़ या घटनेने संतप्त नातेवाईकांनी रूग्णालयात एकच गोंधळ घातला़ घटनेची माहिती मिळताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़अशोक धाकतोडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ़ सचिन देशमुख यांनी रूग्णालयाकडे तातडीने धाव घेतली़ शिवसेनेचे आ़ ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिप उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनीही या प्रकरणाची माहिती घेऊन रूग्णालयाच्या कारभाराबाबत अधिकार्‍यांना धारेवर धरले़ मयत महिलेच्या नातेवाईकांनी संबंधित अधिकार्‍यांसह परिचारिकांवर कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली होती़ घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मयत महिलेच्या पार्थिवाचे इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले़ येडशी येथील डॉ़ कोठावळे, डॉ़शेटे यांनी शवविच्छेदन केले़ दरम्यान, या घटनेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश घाडगे यांनी चोख बंदोबस्त रूग्णालयात लावला होता़ याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी) पोलिसांकडे तक्रार मयत वंदना मडके यांचा भाऊ बालाजी डोंगरे यांनी शहर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात संबंधित अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे़ प्रसुतीदरम्यान डॉक्टर उपस्थित नसल्याने व परिचारिकांनी सुरळीत देखभाल, सेवा न केल्याने वंदनाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संबंधितांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी डोंगरे यांनी निवेदनात केली आहे़

Web Title: Female deaths during delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.