वडगावात स्त्री जन्माचे मिरवणूक काढून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 09:02 PM2018-12-01T21:02:54+5:302018-12-01T21:03:12+5:30
वाळूज महानगर : समाजात कायम दुय्यम स्थान मिळणाऱ्या स्त्रीचा जन्म होताच तिला गर्भातच संपविण्याच्या अनेक घटना ऐकायला व पहायला मिळत आहेत. पण वडगाव कोल्हाटी येथे एका परिवाराने शुक्रवारी ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढून स्त्री जन्माचा आनंदोत्सव साजरा करुन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
वाळूज महानगर : समाजात कायम दुय्यम स्थान मिळणाऱ्या स्त्रीचा जन्म होताच तिला गर्भातच संपविण्याच्या अनेक घटना ऐकायला व पहायला मिळत आहेत. पण वडगाव कोल्हाटी येथे एका परिवाराने शुक्रवारी ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढून स्त्री जन्माचा आनंदोत्सव साजरा करुन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
भारतीय समाज व्यवस्थेत चूल आणि मुल एवढ्या पुरतेच मर्यादित ठेवून स्त्रीयांना कायम दुय्यम स्थान दिले गेले आहे. पोटी जन्माला आलेल्या मुलीला जिवंतपणीच मारुन टाकणाच्या तसेच स्त्री गर्भ असल्याचे समजताच गर्भातच तिला संपविण्याच्या अनेक घटना पुरोगामी महाराष्ट्रात घडत आहेत. पण या व्यवस्थेला फाटा देवून वडगाव कोल्हाटी येथील ग्रा.पं. सदस्य अमित चोरडिया यांनी स्त्रीजन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले.
अमितची पत्नी वैशाली यांनी ९ आॅक्टोबर रोजी पंढरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर चोरडिया यांनी समाजातील प्रत्येकाने स्त्री जन्माचे स्वागत करावे यासाठी अनोख्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. पण मुलीच्या जन्मानंतर वैशाली आपल्या माहेरी गेल्या.
वैशाली व मुलीचे शुक्रवारी वडगाव कोल्हाटी येथे आगमन झाले. कन्या व मातेसह आगमन होताच चोरडिया परिवारातर्फे आतषबाजी करुन स्वागत करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता नातेवाईकांसह येथील सिडको उद्यानापासून घरापर्यंत त्यांची ढोल-ताशाच्या गजरात मिरणूक काढून आनंदोत्सव साजरा केला. घरी गेल्यानंतर मुलीचे व मातेचे औक्षण करुन त्यांचा गृहप्रवेश करण्यात आला. यावेळी चोरडिया परिवारासह नातेवाईक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दरम्यान, समाजात मुलांच्या तुलनेत मुलीला कमी पणाची वागणूक दिली जाते. स्त्री-पुरुष समानतेविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. स्त्री-भ्रूण हत्येमुळे मुलींचा जन्मदर घटला आहे. सर्वांनी मुलीच्या जन्माचे स्वागत करावे, असे मुलीचे आजोबा अनिल चोरडिया व आजी ज्योती चोरडिया यांनी सांगितले.