८१५ ग्रा.पं.मध्ये महिला ग्रामसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:52 PM2017-10-01T23:52:07+5:302017-10-01T23:52:07+5:30
केवळ महिलांच्या प्रश्नांवरच १ आॅक्टोबर रोजी ग्रामसभा घेण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेने जिल्ह्यात ८६२ पैकी ८१५ ग्रामपंचायतींमध्ये महिलांच्या ग्रामसभा घेतल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : केवळ महिलांच्या प्रश्नांवरच १ आॅक्टोबर रोजी ग्रामसभा घेण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेने जिल्ह्यात ८६२ पैकी ८१५ ग्रामपंचायतींमध्ये महिलांच्या ग्रामसभा घेतल्या. उर्वरित ४७ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि ग्रामसेवक हे पुणे येथे आयोजित राष्ट्रपतींच्या कार्यक्रमासाठी गेल्यामुळे त्याठिकाणी ग्रामसभा झाल्या
नाहीत.
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी शासनाच्या निर्णयानंतर विभागातील आठही जि.प.च्या मुख्याध्यापकांना १ आॅक्टोबर रोजी खास महिलांसाठी आणि २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून नियमित ग्रामसभा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्यावर ही जबाबदारी सोपविली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके यांनी तात्काळ एका परिपत्रकाद्वारे जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाºयांना महिलांसाठी ग्रामसभेच्या आयोजनाबाबत कळविले. यासाठी प्रत्येक तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला उपस्थित राहून अहवाल घेण्यासाठी व ‘मी गर्भलिंग निदान करणार नाही आणि ते होऊ देणार नाही’ अशी महिलांना शपथ देण्यासाठी तेथे संपर्क अधिकारीही नेमले.
प्रामुख्याने ग्रामपंचायतींनी १४ व्या वित्त आयोगातील निधीतून अथवा आपल्या उत्पन्नातील १० टक्के निधी महिलांना स्वयंरोजगारासाठी खर्च करणे, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत महिलांच्या मागणीनुसार कामे उपलब्ध करून देणे, बचत गटांसाठी मदत करणे आदी विषयांवर या ग्रामसभेत निर्णय घेण्यात
आले.
ग्रामसभांना गावातील ज्या महिला उपस्थित असतील, त्यांनाच विविध स्वयंरोजगारासाठी निधी अथवा अन्य योजनांचा लाभ द्यावा. अनुपस्थित महिलांना लाभ देऊ नये. ज्यामुळे ग्रामसभांना यापुढे महिलांची उपस्थिती राहील, अशा सूचनाही जिल्हा परिषदेने दिल्या होत्या. जिल्ह्यात महिलांच्या ग्रामसभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके यांनी दिली.