कारागृहातील महिलांची दिवाळी उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 01:09 AM2017-10-22T01:09:03+5:302017-10-22T01:09:03+5:30
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी शनिवारी हर्सूल कारागृहातील कैद्यांसोबत दिवाळी साजरी केली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी शनिवारी हर्सूल कारागृहातील कैद्यांसोबत दिवाळी साजरी केली. कारागृहात असलेल्या महिलांसाठी लवकरच सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन लावण्यात येईल. हिवाळ्यात महिलांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळावे म्हणून सोलर वॉटर हिटर आयोगामार्फत दिला जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
यावेळी रहाटकर यांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले. महिलांना साड्या आणि त्यांच्या मुलांना नवीन कपडे देण्यात आले. महिलांप्रमाणेच पुरुष कैद्यांनाही भाऊबीजेच्या दिवशी फराळ तसेच १०० ब्लँंकेटची भेट देण्यात आली. कारागृहातील ८० महिला कैद्यांशी यावेळी त्यांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा समजून घेतल्या. तपासणीसाठी महिला डॉक्टर असाव्यात, तसेच गंभीर गुन्हे नसलेल्या महिलांना जलद न्याय मिळावा यासाठी लवकरच प्रत्येक आठवड्याला कारागृहात महिला डॉक्टर, स्त्रीरोग तज्ज्ञ, समुपदेशक आणि वकील भेट देणार असून, यामुळे या महिलांच्या आरोग्याच्या तसेच कायदेविषयक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. दिवाळीच्या दिवशी फराळ, नवे कपडे या भेटींसोबतच आपुलकीने विचारपूस करण्यात आल्याने अनेक महिलांना भावना अनावर झाल्या होत्या.
कारागृहात कैद्यांना प्रशिक्षण देऊन दुचाकीचे लॉक तयार करण्याचा रोजगार मिंडा या संस्थेकडून दिला जातो, या कार्यशाळेला रहाटकर यांनी भेट दिली. यावेळी कारागृह अधीक्षक बी. आर. मोरे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी डी. डी. काळे, महिला तुरुंग अधिकारी मेघा कदम तसेच स्थानिक महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मनीषा भन्साळी, भूपेश पाटील, रेखा पाटील, स्मिता दंडवते, दिव्या मराठे, मृणालिनी फुलगीरकर, अमृता पालोदकर, बबिता करवा, रुपाली वाहुळे आदींची उपस्थिती होती.