घाटी रुग्णालयात महिला निवासी डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांकडून शिवीगाळ
By संतोष हिरेमठ | Published: May 17, 2024 12:00 PM2024-05-17T12:00:08+5:302024-05-17T12:00:28+5:30
मध्यरात्री झालेल्या या घटनेनंतर अपघात विभागातील रुग्णसेवा निवासी डॉक्टरांनी बंद ठेवली
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांकडून महिला निवासी डॉक्टरला शिवीगाळ करण्याचा प्रकार झाला. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी अपघात विभागातील रुग्णसेवा थांबवली. तब्बल दोन तासानंतर अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर निवासी डॉक्टरांनी पुन्हा रुग्णसेवा सुरू केली.
अपघात विभागात रात्री एक वाजेच्या सुमारास एक महिला रुग्ण आली. अपघात विभागात रुग्णांची गर्दी असल्याने सदर महिलेची तपासणी करण्यास काहीसा उशीर झाला. मात्र, या महिला रुग्णाची प्रकृती स्थिर होती. यावरून दहा ते पंधरा नातेवाईकांनी महिला निवासी डॉक्टरला शिवीगाळ केली, असे निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेचे अध्यक्ष डॉ. रोहन गायकवाड यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
या घटनेनंतर सर्व निवासी डॉक्टर अपघात विभागसमोर एकत्र आले. पहाटे तीन वाजता अपघात विभागात रुग्णसेवा देणार नसल्याचा पवित्रा निवासी डॉक्टरांनी घेतला. या घटनेची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. सुक्रे हे घाटीत पोहोचले. निवासी डॉक्टरांसोबत त्यांनी चर्चा केली. सुरक्षा व्यवस्थेत वाढ करणे, याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करणे आदी मागणी निवासी डॉक्टरांनी अधिष्ठातांकडे केल्या. या सगळ्यावर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर पहाटे पाच वाजेच्या सुमारास निवासी डॉक्टर पुन्हा रुग्णसेवेत दाखल झाले.