महिला वाहकांच्या गर्भपात सर्वेक्षणाचा अहवाल सादर, महिला कर्मचा-यांमधून रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 02:04 AM2017-08-25T02:04:29+5:302017-08-25T02:04:51+5:30
एसटी महामंडळातील महिला वाहकांना टेबलवर्क देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने गर्भपाताला सामोरे जावे लागत असल्याच्या धक्कादायक सर्वेक्षणाचा अहवाल महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने महामंडळास अलीकडेच सादर केला आहे.
- संतोष हिरेमठ ।
औरंगाबाद : एसटी महामंडळातील महिला वाहकांना टेबलवर्क देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने गर्भपाताला सामोरे जावे लागत असल्याच्या धक्कादायक सर्वेक्षणाचा अहवाल महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने महामंडळास अलीकडेच सादर केला आहे. परंतु अद्यापही टेबलवर्क देण्यासंदर्भात कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात न आल्याने महिला कर्मचा-यांमधून रोष व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने प्रातिनिधिक स्वरूपात राज्यभरात केलेल्या सर्वेक्षणात ७० टक्के महिला वाहकांचे गर्भपात झाल्याचे समोर आले. ‘लोकमत’ने १४ जुलै रोजी हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर याविषयी तीव्र पडसाद उमटले. गरोदर असताना १३८ महिला वाहकांनी प्रशासनाकडे हलके काम देण्याची विनंती केली होती. यामध्ये ६० जणांना हलके काम, टेबलवर्क देण्यात आले; परंतु ७८ जणांना टेबलवर्क देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामध्ये वाहकपदावर कार्यरत असताना ४८ महिला वाहकांनी गर्भपात झाल्याचे नमूद केले, असे महामंडळास दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.
अहवालातील आकडेवारी चुकीची आहे, असे म्हटले जात आहे. आकडेवारी चुकत असेल; परंतु महिला वाहकांचे गर्भपात होतात हे सत्य आहे. योग्य निर्णय घेतला जात नसल्याने आंदोलनाशिवाय पर्याय नाही.
- शीला नाईकवाडे,
राज्य महिला संघटक, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना
संघटनेचा अहवाल हा वैज्ञानिकदृष्ट्या योग्य ठरत नाही. महामंडळाने स्थापन केलेल्या समितीने अहवाल दिला आहे. त्याचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे; परंतु त्यापूर्वीच महिला कर्मचाºयांना आवश्यक त्या सुविधा, रजा, हलके काम दिले जात आहे.
- रणजितसिंह देओल,
उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ