‘उमरा’ यात्रेकरुंची फसवणूक; एक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:16 AM2018-06-23T00:16:27+5:302018-06-23T00:17:21+5:30
अल्पदरात सौदी अरेबियातील ‘उमरा’ला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून शहरातील तब्बल २८ जणांची १५ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी शुक्रवारी ट्रॅव्हल्स एजंट असलेल्या तीन भावांविरोधात गुन्हा नोंदविला. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अल्पदरात सौदी अरेबियातील ‘उमरा’ला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून शहरातील तब्बल २८ जणांची १५ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी शुक्रवारी ट्रॅव्हल्स एजंट असलेल्या तीन भावांविरोधात गुन्हा नोंदविला. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली.
रफिक अब्दुल कय्युम खान (३८, रा. नारेगाव, कौसर पार्क), समीर अब्दुल कय्युम खान आणि मुजाहिद अब्दुल कय्युम खान, अशी आरोपींची नावे आहेत. या घटनेविषयी अधिक माहिती देताना जिन्सी पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी कटकटगेट परिसरातील रहिमनगर येथे ए-१ हज उमरा टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स नावाचे कार्यालय सुरू केले होते. चिकलठाणा परिसरातील कामगार कॉलनीत राहणारे अनिस मगदूम शेख यांना दोन महिन्यांपूर्वी आरोपी रफिक भेटला होता. ही ट्रॅव्हल्स एजन्सी मोठ्या माणसांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या पॅकेजमध्ये तर लहान मुलांना ३६ हजार रुपये घेऊन उमराला नेते आणि परत आणते. या रकमेत भाविकांच्या येण्या-जाण्याचा विमान प्रवास खर्च, व्हिसा आणि १५ दिवस जेवणाची व्यवस्था समाविष्ट आहे. आरोपींवर विश्वास ठेवून अनिस यांनी रफिक यांच्याकडे १७ जणांचे ७ लाख ८० हजार रुपये जमा केले. ३ मे रोजी अॅडव्हान्स म्हणून तीन लाख रुपये आणि १७ जणांचे पासपोर्ट आरोपी रफिककडे जमा केले. नंतर २ जून रोजी आरोपी मुजाहिदकडे अडीच लाख रुपये दिले. १६ जून रोजी आरोपी समीरकडे २ लाख ४० हजार रुपये दिले. १८ जून रोजी उमराला जाण्याची तारीख निश्चित केली होती. अनिस यांच्याप्रमाणेच बायजीपुरा येथील शेख अस्लम शेख महेबूब यांनी पाच जणांचे अडीच लाख रुपये, तर सायराबेगम यांनी चार जणांचे दोन लाख, अशा प्रकारे २८ जणांनी आगाऊ रकमा दिल्या. सर्वांचे सौदी अरेबियाचे तिकीट बुकिंग केल्याची माहिती आरोपी रफिकने दिली.
खाजगी बसने नेले मुंबईला
आरोपी समीरने १७ जून रोजी शहरातील २८ भाविकांना खाजगी बसने मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेले. तेथे नेल्यानंतर समीरने सौदीला जाणारे विमान १८ रोजी रात्री साडेनऊ वाजता असल्याचे सांगितले. एका अधिकाऱ्याला त्यांच्याकडे घेऊन आला. व्हिसासाठी १ लाख २३ हजार रुपयांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सर्वांना सांगितले. यावेळी सर्व भाविकांनी १ लाख २३ हजार रुपये समीरला दिले.
आरोपी फरार
‘उमरा’ टूर रद्द झाल्याने विमानतळावर भाविकांमध्ये निराशेचे आणि संतापाचे वातावरण असताना आरोपी समीर तेथून पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सर्व भाविक खाजगी वाहनाने औरंगाबादेत परतले. त्यानंतर त्यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी चौकशीअंती गुन्हा नोंदविला असून, एक आरोपी अटकेत असून अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांनी सांगितले.
हजची तिकिटेच न काढल्याने परतले औरंगाबादेत
सौदीला जाणाºया विमानाच्या उड्डाणाची वेळ अवघ्या काही मिनिटांवर आल्यावर भाविकांना आरोपींविषयी संशय आल्याने त्यांनी तेथील अधिकाºयांकडे चौकशी केली असता २८ जणांपैकी एकाचेही आरोपींनी विमान तिकीट बुकिंग केले नसल्याचे समजले. विमान तिकिटाचे पैसे दिले तर तुम्हाला ‘उमरा’ ला जाता येईल, असे व्हिसा अधिकाºयांनी सांगितले.