सोनोग्राफीसाठी महिलांची हेळसांड
By Admin | Published: June 13, 2014 12:08 AM2014-06-13T00:08:19+5:302014-06-13T00:39:14+5:30
हिंगोली : शहरातील सामान्य रूग्णालयात सोनोग्राफी काढण्यासाठी येणाऱ्या महिलांची हेळसांड थांबलेली नाही.
हिंगोली : शहरातील सामान्य रूग्णालयात सोनोग्राफी काढण्यासाठी येणाऱ्या महिलांची हेळसांड थांबलेली नाही. आधीच आठवड्यात दोन दिवस दिले असताना त्यातही सोनोग्राफी मशिन बंद राहताना दिसते. परिणामी बुधवारी सकाळपासून रांगा लावलेल्या महिलांना सांयकाळी रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. गुरूवारी दुपारपर्यंत डॉक्टर या विभागाकडे फिरकले नसल्याने शकडो महिलांना रांगेत ताटकळत उभा रहावे लागले.
सामान्य रूग्णलयातील ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्य रूग्णांना बसत आहे. मागील सहा महिन्यांपासून त्याची प्रचिती रूग्णांना येत आहे. कधी मशिन्स बंद राहत आहेत तर कधी डॉक्टर रजेवर जात आहेत. रक्ताअभावी आॅपरेशन करता येत नसून काही वेळी आॅपरेशन थिअटर बंद राहत आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने सामान्य रूग्णालयात समस्यांचा डोंगर उभा राहिलेला आहे. त्यात वचक राहिला नसल्याने डॉक्टरांचा मनमानी कारभार वाढत चाललेला आहे. बुधवारी त्याची प्रचिती ग्रामीण भागातून आलेल्या महिला रूग्णांना आली. सोनोग्राफीसाठी बुधवारी सकाळपासून महिलांनी रांगा लावल्या होत्या. सकाळी ८ वाजता दवाखाना उघडताच महिला डॉक्टरांच्या प्रतिक्षेत होत्या; परंतु डॉक्टरांनी राउंड घेतल्यासारखी या विभागात चक्कर मारली. त्यावेळी दुपारून सोनोग्राफी सुरू करणार असल्याचे डॉक्टरांनी काही महिलांना सांगितले. म्हणून सायंकाळपर्यंत महिला रांगेतून हटल्या नव्हत्या. दवाखाना बंद होण्याची वेळ आली तरी डॉ. राजेश पवार रूग्णालयात आले नव्हते.
परिणामी सकाळपासून वाट पाहणाऱ्या महिला सायंकाळी रिकाम्या हाती घरी परतल्या. बुधवारप्रमाणे गुरूवारचा दिवसही सारखाच उजाडला. आठवड्यात दोनच दिवस सोनोग्राफी सुरू राहत असल्याने महिलांनी गुरूवारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती; पण गुरूवारी देखील डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्यास सुरूवात केली नव्हती. दुपारी २ वाजेपर्यंत महिला रांगेत थांबल्या होत्या. दीड दिवसांपासून सोनोग्राफी प्रतिक्षेत असल्याचे पूनम वाघमारे (पुसेगाव), गीता आवटे (किल्लेवडगाव), विशाखा कांबळे (नांदूर), निशा इंगळे, मनिषा पुंडगे यांनी सांगितले.
याबाबत डॉ. राजेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सामान्य रूग्णालयात कंत्राटी सेवेवर कार्यरत आहे. आठवड्यातून दोन दिवस सोनोग्राफी करण्यासाठी रूग्णालयात येतो. बुधवारी मुलीचा निकाल घेण्यासाठी महाविद्यालयात गेलो होते. त्याआधी सकाळी काही महिलांची सोनोग्राफी केल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)