गटबाजीच्या ‘बाणा’मुळे निष्ठावंत शिवसैनिक घायाळ !

By Admin | Published: February 1, 2017 12:20 AM2017-02-01T00:20:54+5:302017-02-01T00:24:11+5:30

उस्मानाबाद : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस आहे. मात्र, अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेनेतील गटबाजी शमल्याचे दिसत नाही

Feminist Shiva's martyr! | गटबाजीच्या ‘बाणा’मुळे निष्ठावंत शिवसैनिक घायाळ !

गटबाजीच्या ‘बाणा’मुळे निष्ठावंत शिवसैनिक घायाळ !

googlenewsNext

उस्मानाबाद : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस आहे. मात्र, अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेनेतील गटबाजी शमल्याचे दिसत नाही. दिग्गज तसेच शिवसेनेशी अनेक वर्षांपासून निष्ठावंत असलेल्यांना डावलण्यात येत असल्याची भावना शिवसैनिकांत आहे. मागील काही महिन्यांपासून वडगाव गटात तळ ठोकून असलेल्या शंकरराव बोरकर यांचाच पत्ता कट करण्याचा प्रयत्न मंगळवारी काहींनी केला. बोरकर यांच्याऐवजी इतर नवख्या उमेदवाराचे नाव पुढे आल्यानंतर संतप्त झालेल्या बोरकर यांच्या कार्यकर्त्यांनी बार्शी येथे जावून सावंत यांच्या महाविद्यालयासमोर घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे डावलण्यात येत असलेले इतर काही इच्छूक उमेदवारही शिवसेनेचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
नगर परिषद निवडणुकीपासून शिवसेनेतील गटबाजी ऐरणीवर आलेली आहे. प्रारंभी शिवसेना उपनेते सावंत आणि परंड्याचे माजी आ. ज्ञानेश्वर पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला होता. पाटील यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन सावंत यांच्यावर आरोप केले होते. मात्र, त्यानंतर सावंत आणि पाटील यांच्यात दिलजमाई झाली. दरम्यानच्या काळात सावंत यांच्या निशाण्यावर जिल्हा प्रमुख सुधीर पाटील आले. सुधीर पाटील हे थेट विरोधकांशी हातमिळवणी करणारे जिल्हा प्रमुख असल्याचा घणाघात सावंत यांनी सेनेच्या बैठकीतही केला. एवढ्यावरच हे आरोप-प्रत्यारोप थांबले नाहीत. नवनियुक्त पालकमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते हे पद स्वीकारल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात आले. त्यावेळी एका विशिष्ट गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रावते यांच्या बैठकीलाच दांडी मारून सेनेतील सवतासुभा चव्हाट्यावर आणला.
हा गोंधळ एवढ्यावरच थांबला नाही; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीही काही तालुक्यात दोन-दोन वेळा वेगवेगळ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली घेण्याचा प्रकारही यावेळी शिवसेनेत पहायला मिळाला. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना शिवसेनेतील ही गटबाजी तसेच कुरघोडीचे राजकारण थांबेल, असे शिवसैनिकांना वाटत होते. मात्र, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंकरराव बोरकर यांचा पत्ताही कट करण्याचा प्रयत्न मंगळवारी झाला. बोरकर यांच्याऐवजी शिवसैनिक नसलेल्या अन्य व्यक्तीचे नाव वडगाव गटासाठी पुढे आले. ही माहिती बोरकर यांच्या समर्थकांना समजल्यानंतर वडगाव आणि परिसरातील विविध गावांचे सरपंच, शाखा प्रमुख तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी थेट बार्शी येथे जाऊन सावंत यांच्या उपस्थितीत बैठक सुरू असलेल्या महाविद्यालयासमोर घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. बोरकर यांना वडगाव गटातून सन्मानाने तिकीट न दिल्यास या परिसरातील अनेक शिवसैनिक राजीनामा देतील, याबरोबरच निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय करणाऱ्या नेत्यांना निवडणूक प्रचारासाठीही फिरू दिले जाणार नसल्याचा इशारा दिला. त्यामुळे बुधवारी उमेदवारी दाखल करताना काय घडते, याबाबत उत्सुकता आहे.

Web Title: Feminist Shiva's martyr!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.