गावातील सोसायटीतच मिळणार खत; नऊ परवाने, शेतकऱ्यांचीही सोय !
By स. सो. खंडाळकर | Published: December 8, 2023 07:24 PM2023-12-08T19:24:35+5:302023-12-08T19:24:53+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६९२ विकास सोसायट्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर : पीएमकेएसके म्हणजे पंतप्रधान किसान समृध्दी केंद्र योजनेंतर्गत देशभरातील विविध कार्यकारी सोसायट्यांना १५१ प्रकारचे उद्योग करण्याची परवानगी मिळणार आहे. गेल्या चार महिन्यांपासून यासंदर्भातील प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा बँकेशी संलग्न ६९२ विकास सोसायट्यांना खत विक्रीचा परवाना दिला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पूर्वीपासूनच खतविक्री करीत असलेल्या असलेल्या नऊ सोसायट्यांना परवाना मिळून गेलेला आहे.
जिल्हा बँकेशी संलग्न सोसायट्यांना परवाने
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६९२ विकास सोसायट्या आहेत. त्या सोसायट्यांना १५१ प्रकारचे उद्योग सरता येऊ शकतील. बी-बियाणे व खतविक्री आधीपासूनच करीत असलेल्या नऊ सोसायट्यांना हे परवाने मिळून गेलेले आहेत.
जिल्ह्यात नऊ सोसायट्यांना परवाने
आधीच बी - बियाणे व खतविक्री करणाऱ्या नऊ संस्थांना परवाने मिळालेले आहेत. त्यापैकी लाडसावंगी, पिंप्रीराजा हे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील, चिकलठाण, जैतखेडा व वडाळी हे कन्नड तालुक्यातील, धानोरा, पालोद व अंधारी हे सिल्लोड तालुक्यातील व पैठण हे पैठण तालुक्यातील. याप्रमाणे या सोसायट्या आहेत. जिल्ह्यातील १५० सोसायट्या अ व ब वर्गातल्या आहेत. त्यांनी पुढे यायला पाहिजे. ८२ सोसायट्यांनी कॉमन सर्विस सेंटरसाठी अर्ज केलेले आहेत. त्या सुरुही झालेल्या आहेत. जनऔषधीसाठी ७ सोसायट्यांनी, ग्रीन स्टोअरेजसाठी ७ सोसाट्यांनी अर्ज केलेले आहेत. पेट्रोलपंप हर्सूल विकास सोसायटीला सुरू करता येईल. कन्नडच्या दाभाडी सोसायटीनेही पेट्रोल पंपासाठी अर्ज केला आहे.
कर्जवाटपासोबत आता किरकोळ खतविक्रीही करणार
विविध सहकारी सोसायट्या त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार कर्जवाटप तर करीतच असतात. पण, आता या १५१ उद्यागांचे दालनही त्यांना खुले झाले आहेत. त्यापैकी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सभासदत्व घेण्यासाठी काही सोसायट्या पुढे आल्या आहेत. भारतीय बीज सहकरी संस्थेच्या सभासदत्त्वासाठी १५ सोसायट्या, भारतीय निर्माण सहकारी संस्थेच्या सभासदत्त्वासाठी दोन सोसायट्या व भारतीय सेंद्रिय शेती सहकारी संस्थेच्या सभासदत्त्वासाठी एक सोसायटी उत्सुक आहे.
खत दुकाने चालविण्यासाठी घ्या पुढाकार
सोसायटी नफ्यात आहे का, तिची स्वत:ची जागा आहे का, या गोष्टींवर बरेच अवलंबून आहे. बी - बियाणे व खतविक्रीचे परवाने घेण्यासाठी सोसायट्यांनी पुढे येण्याची गरज आहे. नव्या सोसायट्यांनीही पुढाकार घेतला पाहिजे.
सोसायट्यांच्या सक्षमतेवर अवलंबून
देशभरातील विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत एकूण १५१ प्रकारचे उद्योग सुरू करता येणार आहेत. अर्थात हे सोसायट्यांच्या सक्षमतेवर अवलंबून आहे. त्यासाठीची ऑनलाइन अर्ज करणे, नोंदणी करणे व निकषात बसले तर परवानगी देणे, या बाबी सुरू आहेत. त्यादृष्टीने जिल्हानिहाय आढावे घेतले जात आहेत. जिल्हा पातळीवर याच्या समन्वयाचे काम जिल्हा उपनिबंधक करीत आहेत.
-जे. बी. गुट्टे, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर