भांगसीमाता गडावर महोत्सवाची सांगता
By Admin | Published: October 12, 2016 12:46 AM2016-10-12T00:46:42+5:302016-10-12T01:15:29+5:30
वाळूज महानगर : शरणापूरच्या ऐतिहासिक भांगसीमाता गडावर नवरात्र महोत्सव व जपानुष्ठान सोहळ्याची उत्साहात सांगता करण्यात आली.
वाळूज महानगर : शरणापूरच्या ऐतिहासिक भांगसीमाता गडावर नवरात्र महोत्सव व जपानुष्ठान सोहळ्याची उत्साहात सांगता करण्यात आली. या प्रसंगी श्री श्री १००८ स्वामी परमानंदगिरी महाराज यांचे प्रवचन व मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती.
स्वामी परमानंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीत या महोत्सवात दहा दिवस धार्मिक कार्यक्रम पार पडले. १० आॅक्टोबरला सकाळी ५.३० वाजता स्वामी परमानंदगिरी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा करून भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. यानंतर लेझीम पथक व डोक्यावर कलश घेतलेल्या महिलांसह भाविकांनी भव्य मिरवणूक काढून मातेचे दर्शन घेतले.
या प्रसंगी प्रवचनातून समाजप्रबोधन करताना स्वामी परमानंदगिरी महाराज म्हणाले की, समाजाला दिशा देण्याचे काम साधू-संतांचे असून त्यांची शिकवण व विचार आचरणात आणण्याची गरज आहे. जीवनात आई-वडील, साधू-संत व रंजल्या-गांजलेल्याची सेवा करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतल्यास समाजाची खऱ्या अर्थाने प्रगती होईल. निष्काम सेवा व फळाची अपेक्षा न करता कार्य केल्यास आत्मिक समाधान व मनाला शांती मिळते, असेही परमानंद गिरी महाराज यांनी सांगितले. प्रवचनानंतर महाप्रसादाने या धार्मिक महोत्सवाची सांगता करण्यात आली.
या प्रसंगी खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय सिरसाठ, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, उपाध्यक्ष दिनकर पवार, जि.प.सदस्य अनिल चोरडिया आदींसह औरंगाबाद, जालना, परभणी, नाशिक, नगर, जळगाव, चाळीसगाव आदी भागातील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.