मकर संक्रांतीचा सण उत्साहात
By Admin | Published: January 16, 2015 01:01 AM2015-01-16T01:01:17+5:302015-01-16T01:09:58+5:30
लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. तीळगुळ देऊन एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. तीळगुळ देऊन एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तर महिलांनी मंदिरात मनोभावे पूजा केली. शिवाय, एकमेकींना हळदी-कुंकू लावून शुभेच्छा दिल्या. लातूर शहरातील विविध मंदिरांत सकाळी दहा वाजेपासून दर्शनासाठी महिलांच्या रांगा लागल्या होत्या.
बार्शी रोडवरील हनुमान मंदिर, प्रकाश नगर येथील दत्त मंदिर तसेच लातूर शहरातील बालाजी मंदिर, श्री वैद्यनाथ महादेव मंदिर आदी मंदिरांमध्ये महिलांची दर्शनासाठी गर्दी होती. सुगडे पूजन करून एकमेकींना वाण देऊन मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात आला. मकर संक्रांतीच्या सणात तिळाचे फार महत्व असून, थंडीच्या दिवसांत तीळ खाल्ल्याने अंगात उष्णता निर्माण होते. तीळ खाल्ल्याने स्निग्धताही येते. स्निग्धता म्हणजे स्नेह व मैत्री असाही अर्थ निघतो. त्यामुळे ‘तीळगुुळ घ्या आणि गोड गोड बोला’ अशा शुभेच्छा या सणानिमित्त दिल्या जातात. गुरुवारी दिवसभर तीळगुळ वाटपाचा कार्यक्रम सुरू होता. मित्र, मैत्रिणी तसेच आप्तेष्टांना तीळगुळ देऊन मकर संक्रांतीचा सण साजरा झाला. लातूर शहरासह जिल्ह्यात या सणाचा उत्साह होता. हळदी-कुंकू, फणी, काजळ, शिकेकई आदी वस्तू देऊन महिलांनी मकर संक्रांतीचा सण साजरा केला. बुधवारी लातूर शहरातील बाजारपेठेत या वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. गुरुवारी सकाळपासूनच बाजारपेठ फुलली होती. मकर संक्रांतीनिमित्त लागणाऱ्या वस्तूंचे स्टॉल्स बाजारात होते. (प्रतिनिधी)