ताप, डोकेदुखी, अंगदुखी; मंकीपॉक्सची लक्षणे नाहीत ना?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 08:45 PM2024-08-30T20:45:08+5:302024-08-30T20:45:18+5:30
घाबरू नका, खबरदारी घ्या : आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन
छत्रपती संभाजीनगर : मंकी पॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून संसर्गित रुग्ण २ ते ४ आठवड्यात बरा होतो. लहान मुलांमध्ये किंवा इतर काही रुग्णांमध्ये हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या दृष्टीने आरोग्य विभागाने ‘घाबरू नका... पण, खबरदारी बाळगा’ असे आवाहन नागरिकांना केले आहे.
मंकी पॉक्स या संसर्गजन्य आजाराचा प्रसार होऊ नये व झाल्यास तत्काळ उपाययोजना कराव्या, असे आरोग्य यंत्रणेने कळविले आहे. साधारणपणे, अंगावर अचानक पुरळ उठणे, लसिका ग्रंथी सुजणे, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, प्रचंड थकवा आदी लक्षणे दिसताच तत्काळ डॉक्टरांना दाखवावे व रक्ताची चाचणीही करून घेणे गरजेचे आहे.
सध्या जगातील विविध देशात ‘मंकी पॉक्स’ या विष्णूजन्य आजाराचा संसर्ग वाढत आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंकी पॉक्स संसर्गाचा वेग व तीव्रता कमी करण्याच्या अनुषंगाने वेळीच प्रतिबंध सर्वेक्षण व नियंत्रणाबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
मंकी पॉक्स म्हणजे काय ?
मंकी पॉक्स हा आजार ‘ऑर्थोपॉक्स’ या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. साधारणतः अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी एक ते दोन दिवसांपासून ते त्वचेवरील फोडावरील खपल्या पडेपर्यंत किंवा ते पूर्णपणे मावळेपर्यंत बाधित रुग्ण इतर व्यक्तीसाठी संसर्गजन्य असतो.
जिल्ह्याला अलर्ट
जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वतीने मंकी पॉक्स या विषाणूजन्य आजाराला आळा घालण्यासाठी प्रतिबंध सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत असून या आजाराविषयी ‘अलर्ट’ देण्यात आला आहे.
विलगीकरण आवश्यक
संशयित मंकी पॉक्स रुग्णाचे वेळीच विलगीकरण करण्याची दक्षता घ्यावी. जोपर्यंत रुग्णाच्या कातडीवरील पुरळ, फोड पूर्णपणे बरे होत नाहीत आणि त्यावरील खपल्या गळून जात नाहीत तोपर्यंत त्याला विलगीकरणात ठेवावे.
काय काळजी घ्याल?
रुग्णांच्या कपड्यांची अथवा अंथरुण-पांघरुणाशी अन्य व्यक्तीचा संपर्क येऊ देऊ नये. हातांची स्वच्छता राखावी, निकट सहवासीतांमध्ये २१ दिवस पाठपुरावा करावा, रुग्णास ताप आल्यास प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी.