कर्जमाफीच्या यादीत मोजकीच नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:15 AM2017-10-31T00:15:17+5:302017-10-31T00:17:18+5:30
कर्जमाफीस पात्र शेतक-यांच्या ‘ग्रीन’ यादीमध्ये अनेक गावांमधील एकही शेतक-यांचे नाव नाही, तर काही गावांतील मोजक्याच शेतक-यांची नावे यादीत दिसत आहेत
चिंता कायम : संगणकीकृत वर्गीकरणामुळे तांत्रिक अडचण
जालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीस पात्र शेतक-यांच्या ‘ग्रीन’ यादीमध्ये अनेक गावांमधील एकही शेतक-यांचे नाव नाही, तर काही गावांतील मोजक्याच शेतक-यांची नावे यादीत दिसत आहेत. त्यामुळे शेतक-यांमध्ये संभ्रम वाढला असून, कर्जमाफी मिळणार की नाही याची चिंता कायम आहे.
कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यासाठी अर्ज सादर करण्यापासून तर पात्र शेतक-यांची निवड ही सर्वच कामे संगणकाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. मात्र बँक खात्याला आधार कार्ड संलग्न नसणे, बँकेसह शेतक-यांकडून आॅनलाईन अर्ज भरताना नावाच्या स्पेलिंगमध्ये झालेल्या चुका, आधार कार्डवरील चुकीचा पत्ता यामुळे संगणकाच्या माध्यमातून तयार करण्यात येत असलेल्या कर्जमाफीस पात्र शेतक-यांच्या याद्यांमध्ये अनेक शेतक-यांची नावे समाविष्ट झालेली नाहीत. बँकांनी आॅनलाइन पोर्टलवर ६५ कॉलममध्ये आॅनलाईन माहिती भरताना आधार क्रमांकाचा कॉलम रिकामा सोडलेला असेल तर संगणकीकृत वर्गीकरणामध्ये हे अर्ज अपूर्ण समजून पिवळ्या यादीत जात आहेत. मात्र, पिवळ्या यादीची कुठलीही माहिती ‘आपले सरकार पोर्टल’वर नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये संभ्रम वाढला आहे. तालुक्यातील माळशेंद्रा येथील सुमारे साडेचारशे शेतक-यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले आहेत. मात्र, लाभार्थ्यांच्या यादीत एकाही शेतक-याच्या नावाचा समावेश नाही. धारकल्याण येथील केवळ सात शेतक-यांची नावे ग्रीन यादीमध्ये दाखविण्यात आली आहेत. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील अनेक गावांच्या बाबतीत आहे. स्थानिक बँकांनी आपली माहिती मुख्य शाखेकडे पाठवली आहे. त्यामुळे कर्जमाफीबाबत बँकेत विचारण्यास जाणा-या शेतक-यांना बँक अधिकारी कर्जमाफीबाबत कुठलीच माहिती उपलब्ध नसल्याचे सांगत आहेत. तालुकानिहाय कर्जमाफीची प्रक्रिया हाताळणा-या समित्यांचे अध्यक्ष व सचिव पात्र शेतक-यांच्या याद्या वरिष्ठ स्तरावरूनच येत असल्याचे सांगत आहेत. जिल्ह्यातील दोन लाख १५ हजार कुटुंबांनी कर्जमाफीसाठी तीन लाख ९७ हजार अर्ज दाखल केले आहेत. तर बँकांनी ३ लाख १२ हजार शेतक-यांची माहिती आॅनलाईन भरली आहे. असे असेल तरी जिल्ह्यातील किती शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल हे सांगणे सध्या तरी अनिश्चित असल्याचे अधिकारी सांगत आहेत.
-------------
रेकॉर्ड सापडत नसल्याचा संदेश
सध्या ‘आपले सरकार वेब पोर्टल’वर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी अर्ज भरलेल्या शेतक-यांची यादी तर दुस-या बाजूला लाभार्थ्यांची यादी अशी माहिती देण्यात आली आहे. लाभार्थ्यांच्या यादीत काही गावांमधील पाच ते सहा शेतक-यांचीच नावे दिसत आहेत. तर बहुतांश गावांचे रेकॉर्ड सापडत नसल्याचा संदेश प्राप्त होत आहे.