उद्योगनगरीत हातमोजांच्या कंपनीला भीषण आग; मशिनरीसह साहित्य भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2021 07:46 PM2021-07-06T19:46:37+5:302021-07-06T19:47:26+5:30
क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेडमधील तयार विविध प्रकारचे हॅण्डग्लोज, कॉटन, आदी साहित्यासह कंपनीतील एअर कॉम्प्रेसर, शिलाई मशीन व हॅण्डग्लोज तयार करणाऱ्या ६ मशीन व इतर २ मशीन आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या.
वाळूज महानगर : उद्योगनगरीतील हॅण्डग्लोज अर्थात हातमोजे व इतर सुरक्षा साधने तयार करणाऱ्या श्री गुरुदेव इंडस्ट्रिज या कंपनीला मंगळवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत कंपनीतील आठ मशिनरींसह रॉ-मटेरियल व तयार साहित्य भस्मसात झाले असून, आगीचे कारण समजू शकले नाही.
भानुदास वासुदेव पळसकर (रा. सिडको वाळूजमहानगर) यांनी वाळूज एमआयडीसीतील खासगी गटनंबर ३४ मध्ये भाडेतत्त्वावरील जागेत हॅण्डग्लोज व इतर सुरक्षा साधने तयार करण्याची कंपनी आहे. मंगळवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास वरच्या मजल्यावर असलेल्या पत्र्याच्या शेडमधून अचानक धूर निघू लागला. ही बाब लक्षात येताच ऑपरेटर कालुराम याने शेडबाहेर पडत याची माहिती भानुदास पळसकर यांना दिली. दरम्यान, क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेडमधील तयार विविध प्रकारचे हॅण्डग्लोज, कॉटन, आदी साहित्यासह कंपनीतील एअर कॉम्प्रेसर, शिलाई मशीन व हॅण्डग्लोज तयार करणाऱ्या ६ मशीन व इतर २ मशीन आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. या आगीची माहिती मिळताच वाळूज अग्निशमन विभागाचे एस. एफ. वासनकर, एस. आर. गायकवाड, एस. एस. अंभोरे, एम. डी. पाचांगणे, आर. ए. चौधरी, बी. एन. राठोड, पी. एस. कोलते, उपनिरीक्षक राहुल निर्वळ, आदींनी घटनास्थळी जाऊन लगतच्या कंपन्यांतील कामगारांच्या मदतीने दीड तासात आगीवर नियंत्रण मिळविले.
दहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज
या आगीत कंपनीतील मशिनरी, विविध प्रकारचे तयार हॅण्डग्लोज आगीत भस्मसात झाले असून, यामध्ये किमान दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज उद्योजक भानुदास पळसकर यांनी व्यक्त केला आहे. आगीत मशिनरीसह सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. सुदैवाने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आल्याने या भागातील इतर कंपन्यांना आगीची झळ बसली नाही.