पंधरा दिवसांपासून अर्ध्या शहरात निर्जळी

By Admin | Published: August 27, 2015 12:04 AM2015-08-27T00:04:47+5:302015-08-27T00:04:47+5:30

उस्मानाबाद : उजनी योजना कार्यान्वीत झाल्यानंतर टंचाईच्या जोखडातून कायमची मुक्तता होईल, असे बोलले जात होते. मात्र, आजही शहराला सहा ते आठ

From the fifteen days to the half-city, the dewy | पंधरा दिवसांपासून अर्ध्या शहरात निर्जळी

पंधरा दिवसांपासून अर्ध्या शहरात निर्जळी

googlenewsNext



उस्मानाबाद : उजनी योजना कार्यान्वीत झाल्यानंतर टंचाईच्या जोखडातून कायमची मुक्तता होईल, असे बोलले जात होते. मात्र, आजही शहराला सहा ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला होत आहे. असे असतानाच आठवडभरापूर्वी हातलादेवीच्या पायथ्याशी असलेल्या पंपहाऊसमधील विद्युत मोटारीचे शॉप्ट निकामी झाल्याने अर्ध्याअधिक शहरामध्ये निर्जळी आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यास आणखी सात ते आठ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
तीन-चार वर्षांपासून सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. त्यामुळे उस्मानाबादकरांना टंचाईला तोंड द्यावे लागत असे. शहरातील बहुतांश कुपनलिका कोरड्याठाक पडल्या आहेत. तर काही कुपनलिका अखेरच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे शहरातील टंचाईची तीव्रता दिवसागणिक वाढू लागली आहे. असे असतानाच आठवडाभरापूर्वी हातलादेवीच्या पायथ्याशी असलेल्या पंपहाऊसमधील विद्युत पंपामध्ये तांत्रिक बिघाड आला आहे. पंपाचे शॉप्ट गंजले आहे. त्यामुळे उजनी योजनेद्वारे होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. याचा फटका जवळपास अर्ध्याअधिक शहराला बसत आहे. काही ठिकाणी पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा होवू शकलेला नाही. तर काही भागात आठ दिवसांपासून पाणी आलेले नाही. ज्या भागाचा पाणीपुरवठा कुपनलिकांवर अवलंबून आहे, त्या भागात पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अत्यल्प आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, नगर परिषदेकडून सदरील विद्युतपंप दुरूस्तीसाठी नगर येथे पाठविण्यात आला आहे. असे असले तरी दुरूस्तीला आणखी किमान तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. विद्युतपंप बसविल्यानंतर पाणी फिल्टरमध्ये पडण्यास एक दिवसाचा कालावधी लागतो. त्यानंतर कुठे पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. म्हणजेच शहराला उजनीचे पाणी सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला मिळेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
शहरामध्ये पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. असे असतानाही अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्याचे दिसून आले. शहरातील किती कुपनलिका बंद आहेत?, उजीने याजनेच्या पंपामध्ये कोणत्या स्वरूपाचा बिघाड आला? यासह आदी बाबींची माहिती जबाबदार अधिकाऱ्यांकडे नव्हती. त्यामुळे प्रशासन पाणीपुरवठ्याबाबत कती गंभीर आहे? हेच यातून समोर येते.
भोंग्याचा आवाजही दबला !
अनेक भागात पंधरा दिवस लोटले तरी पाणीपुरवठा होवू शकलेला नाही. पूर्वी ठरलेल्या दिवशी पाणीपुरवठा होणार नसेल तर भोंगा लावून तसे कळविले जात होते. परंतु, यावेळी अनेक भागामध्ये पालिकेचा भोंगा फिरलेला नाही. त्यामुळे अशा भागातील नागरिक नगर परिषदेत जावून पाण्याबाबत विचारणा करीत आहेत. त्यामुळे या प्रकाराबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
टंचाईत ‘प्रभारी’राज
नगर परिषदेचे मुख्याधिकारी शशीमोहन नंदा हे रजेवर आहेत. त्यामुळे या पदाचा कार्यभार नायबतहसीलदार जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसेच मकरंद राजेनिंबाळकर यांचे नगराध्यक्षपद अपात्र ठरल्याने तेही कार्यालयात येत नाहीत. पालिका प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने महत्वाच्या या दोन्ही पदावर कायमस्वरूपी व्यक्ती नसल्याने टंचाई निवारणार्थ अपेक्षित नियोजन होत नसल्याचे बालले जात आहे.
मारवाडगल्ली, सांजावेस, मुख्य रस्ता, नेहरू चौक, गवळी गल्ली, निंबाळकर गल्ली, समतानगर आदी भागात मागील आठ ते पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा होवू शकलेला नाही. त्यामुळे नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ ओढावली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज आहे. तशी मागणीही होत आहे. परंतु, याबाबत प्रशासनाकडून पाऊले उचलली जात नसल्याचे सांगण्यात येते.

Web Title: From the fifteen days to the half-city, the dewy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.