फौजदाराने पळविली साडेअकरा लाखांची रोकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:27 AM2018-06-12T00:27:16+5:302018-06-12T00:27:34+5:30
जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अटक करण्यासाठी बीड बायपास परिसरात छापा टाकणारे गोंदी (ता. अंबड, जि. जालना) पोलीस ठाण्याचे फौजदार व सहायक फौजदाराने फ्लॅॅटमधील साडेअकरा लाख रुपये बळजबरीने नेल्याचा आरोप गुन्हेगाराच्या नातेवाईकाने केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अटक करण्यासाठी बीड बायपास परिसरात छापा टाकणारे गोंदी (ता. अंबड, जि. जालना) पोलीस ठाण्याचे फौजदार व सहायक फौजदाराने फ्लॅॅटमधील साडेअकरा लाख रुपये बळजबरीने नेल्याचा आरोप गुन्हेगाराच्या नातेवाईकाने केला. शेवटी पोलीस व तक्रारदार पहाटे चार वाजेच्या सुमारास पुंडलिकनगर ठाण्यात दाखल झाले. विशेष म्हणजे छापा टाकण्यापूर्वी शहरातील संबंधित पोलीस ठाण्यात गोंदीच्या पोलीस पथकाने नोंद केली नसल्याचे समोर आल्याने या कारवाईविषयी संशय निर्माण झाला आहे.
गोंदी येथील वाळू ठेकेदार सचिन गणपतराव सोळुंके हे बीड बायपास परिसरातील समर्थ अपार्टमेंट येथे राहतात. त्यांचे नातेवाईक विजय सोळुंके, सुयोग सोळुंकेसह अन्य दोघांविरुद्ध गोंदी ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा काही दिवसांपूर्वी दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमन सिरसाट करीत आहेत. सचिन सोळुंके यांनी यासंदर्भात पुंडलिकनगर पोलीस ठाणे व माध्यम प्रतिनिधींना सांगितले की, गुन्ह्यातील आरोपी समर्थ अपार्टमेंटमध्ये लपलेले असल्याची माहिती खबºयाकडून पोलिसांना मिळाली. त्यावरून उपनिरीक्षक सिरसाट, सहायक उपनिरीक्षक एम.एन. सय्यद हे रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास खाजगी कारने आरोपीला पकडण्यासाठी औरंगाबादेत आले. त्यांच्यासोबत अन्य दुसºया कारमध्ये काही खाजगी लोक होते. सचिन सिरसाट यांच्या घराचे दार ठोठावल्यानंतर पोलीस थेट घरात घुसले. संपूर्ण घराची पोलिसांनी आणि सोबतच्या लोकांनी झडती घेतली. मात्र, आरोपी भेटले नाही. तेथील एका कपाटाच्या लॉकरमधील साडेअकरा लाख रुपये उपनिरीक्षक सिरसाट यांनी घेतले. ही रक्कम घेऊन ते कारने बीड बायपास रस्त्याच्या दिशेने गेले. तेथून ते सातारा ठाण्यात गेले.
त्यामुळे मी माझ्या मित्रांना बोलावून घेतले आणि त्यांचा पाठलाग केला. सातारा पोलिसांनी कारवाईचे स्थळ पुंडलिकनगर हद्दीत येत असल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे सातारा ठाण्यातून ते बाहेर पडले आणि सूतगिरणी चौकात आले. तेथे बराच वेळ थांबल्यानंतर जवाहरनगर ठाण्यासमोर जाऊन उभे राहिले. तेथेही अर्धा तास थांबून पोलीस उपनिरीक्षक सिरसाट आणि सोबतचे कर्मचारी गजानन महाराज मंदिर रोडवरील एका हॉटेलमध्ये गेले. तेथे त्यांनी चहा नाश्ता घेतला. प्रत्येक ठिकाणी मी आणि माझ्या मित्रांनी पोलिसांना आमचे पैसे परत करण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी पैसे दिले नाहीत. चार वाजेच्या सुमारास सर्वजण पुंडलिकनगर ठाण्यात आले. ठाण्याबाहेर कार उभी करून त्यात त्यांनी एका बॉक्समध्ये रक्कम ठेवली.
या कालावधीत उपनिरीक्षक सिरसाट यांनी जप्त रकमेपैकी दोन लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप सचिन सोळुंके यांनी केला. ही रक्कम कायदेशीर असल्याने तुम्हाला त्यातील एक रुपयाही मिळणार नाही, असे सोळुंके यांनी सिरसाट यांना सांगितल्यानंतर त्यांनी ही रक्कम जप्त केल्याचे सचिन यांचे म्हणणे आहे. उपनिरीक्षक सिरसाट आणि सहायक उपनिरीक्षक सय्यद यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षक सिनगारे यांच्याकडे केली.
आरोप : जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाविरुद्ध तक्रार
स्टेशन डायरीला ‘ना नोंद ना पंचनामा’
विशेष म्हणजे औरंगाबादला येण्यापूर्वी त्यांनी गोंदी ठाण्यातील डायरीत याबाबतची नोंद करणे आवश्यक होते. तशी नोंद त्यांनी रात्री केली नसल्याचे सूत्रांकडून समजले. दरम्यान, औरंगाबादेत आल्यानंतरही त्यांनी पुंडलिकनगर ठाण्यात याबाबतची नोंद केली नसल्याचे पोलीस निरीक्षक एल.ए. सिनगारे यांनी सांगितले. तक्रारदारांचा अर्ज प्राप्त झाला असून, चौकशी केली जात असल्याचे ते म्हणाले.