हातचलाखीने अभियंत्याचे पंधरा हजार पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 10:28 PM2019-02-22T22:28:35+5:302019-02-22T22:28:46+5:30
कॅश डिपॉझिट मशिनमध्ये एक लाख रुपये टाकण्यासाठी मदत करण्याची विनंती करीत दोन भामट्यांनी हातचलाखीने अभियंत्याचे पंधरा हजार रुपये लांबविले.
औरंगाबाद : कॅश डिपॉझिट मशिनमध्ये (सीडीएम) एक लाख रुपये टाकण्यासाठी मदत करण्याची विनंती करीत दोन भामट्यांनी हातचलाखीने अभियंत्याचे पंधरा हजार रुपये लांबविले. ही घटना २१ फे ब्रुवारी रोजी सिडको एन-४ येथील एसबीआयच्या एटीएम सेंटरवर घडली.
न्यू हनुमाननगर येथील अभियंता सचिन काशीनाथ देवरे हे २१ रोजी दुपारी सिडको एन-४ येथील एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी एटीएममधून १४ हजार रुपये काढले. तेव्हा तेथे उभा असलेल्या एका भामट्याने तो सीडीएम मशीनमध्ये एक लाख रुपये भरण्यासाठी आल्याचे म्हणाला. ही रक्कम सीडीएममध्ये टाकण्यासाठी मदत करण्याचा तो आग्रह धरू लागला. त्याचवेळी त्या भामट्याचा दुसरा साथीदार तेथे आला आणि त्यानेही आपण या माणसाला मदत करू असे सचिनला म्हणाला. त्यानंतर सचिन सीडीएममध्ये पैसे टाकण्यास तयार झाला.
त्यावेळी दुसऱ्या व्यक्तीने त्याला सांगितले की, याची सर्व रक्कम आपल्याकडे घेऊ आणि आपल्याकडील पैसे त्याला देवू आणि पैसे टाकून जाऊ. त्याच्यावर विश्वास ठेवून सचिनने त्याच्याजवळील रोख पंधरा हजार रुपये त्याला दिले. त्यानंतर त्याने एक लाख रुपयांची रोकड म्हणून रूमाला बांधून आणलेले बंडल सचिनला दिले आणि तो पंधरा हजार रुपये घेऊन तेथून गायब झाला. त्याचवेळी तू सीडीएममध्ये पैसे टाक मी आलोच असे सांगून दुसराही तेथून निघून गेला. त्यानंतर सचिन यांनी रूमालाची गाठ सोडून पाहिले असता त्या रूमालात पैशाऐवजी कागदाची बंडले असल्याचे त्यास दिसले. याघटनेनंतर सचिन यांनी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार नोंदविली.