विकासासाठी पंधरा गावे घेतली दत्तक
By Admin | Published: September 5, 2016 12:29 AM2016-09-05T00:29:46+5:302016-09-05T01:01:46+5:30
परळी : फुलोरा फाऊंडेशनच्या वतीने परळी तालुक्यातील १५ गावांची निवड करण्यात आली असून, त्या ठिकाणी सार्वजनिक विकासाची कामे केली जाणार आहेत.
परळी : फुलोरा फाऊंडेशनच्या वतीने परळी तालुक्यातील १५ गावांची निवड करण्यात आली असून, त्या ठिकाणी सार्वजनिक विकासाची कामे केली जाणार आहेत. यामुळे त्या गावांचा कायापालट होणार आहे.
परळी येथे आयोजित पत्रकार परिषद प्रसंगी फुलोरा फाऊंडेशनचे सर्वेसर्वा मयांक गांधी यांनी आपली विकासाबाबती भूमिका स्पष्ट करताना गावांचा शाश्वत विकास करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी डॉ. हरिश्चंद्र वंगे, डॉ. दे.घ. मुंडे, शिवाकांत अंदुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना मयांक गांधी म्हणाले, गाव बदलल्याशिवाय देश बदलणार नाही, ही महात्मा गांधींची विचारसरणी आजही कायम आहे. ग्रामीण भागाचा कायापालट होणे अत्यंत गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही बीड जिल्ह्यातील परळी तालुक्याची निवड केली आहे. फुलोरा फाऊंडेशन १५ गावांमध्ये मोठी कामे करणार आहे. झालेला कमी पाऊस आणि दुष्काळाचे संभाव्य सावट लक्षात घेता. ग्रामस्थांचा आर्थिक स्रोत वाढविणार असल्याचे गांधी म्हणाले. शेतकऱ्यांना शेवगा, दुधी भोपळा, कारल्याची झाडे दिले असून, त्यातून उत्पन्न मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना शेळी व कोंबड्या दिल्या असून, गाभण शेळ्यातील पुढे जन्मणाऱ्या पिलांचे वाटप करणार असल्याचे ते म्हणाले. केवळ शेतीवरच विसंबून राहता येणार नसल्याने एका नामांकित कंपनीसोबत करार करणार असून, त्या मार्फत ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार आहे. आरोग्य शिबिरे, ड्रीप इरिगेशन शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. तसेच दारुचे व्यसन व हुंडा पद्धती मुळापासून उखडून काढण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचेही ते म्हणाले. १५ गावांमध्ये सलग तीन वर्षे काम केले जाणार असून, ही सर्व कामे मोफत केली जाणार आहेत. यासाठी आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून मदत मिळणार आहे. याचा लाभ गावांना होईल. (वार्ताहर)