पन्नास फुटी ‘रावणा’चा ४० फूट व्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:20 AM2017-09-30T00:20:34+5:302017-09-30T00:20:34+5:30
येथील ग्रामदेवता खंडेश्वरी देवस्थानातील शारदीय नवरात्र महोत्सवात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता सीमोल्लंघन होणार आहे. रावण दहन आणि फटाक्यांची आतषबाजी यावेळी आकर्षण राहणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील ग्रामदेवता खंडेश्वरी देवस्थानातील शारदीय नवरात्र महोत्सवात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता सीमोल्लंघन होणार आहे. रावण दहन आणि फटाक्यांची आतषबाजी यावेळी आकर्षण राहणार आहे. यावर्षी ५० फूट उंच रावण प्रतिकृती तयार केली असून त्याचा व्यास ४० फुट आहे. या रावणासाठी ७० मीटर कपडा लागला आहे.
विजयादशमीच्या दिवशी खंडेश्वरी यात्रेत रावण दहनाचा कार्यक्रम मागील अनेक वर्षांपासून मोठे आकर्षण ठरला आहे. सीमोल्लंघनानंतर लाखो भाविकांच्या उपस्थितीत रावण दहन केले जाते. मागील १५ दिवसांपासून रावणाची प्रतिकृती तयार करण्यासाठी मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रणजितसिंह चौहान, सचिव बापूराव चौरे, राजेंद्र बनसोडे तसेच विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मण शेणकुडे, जयंत राऊत, विश्वंभर तपासे, सचिन घोडके यांच्यासह तरूण मंडळींनी परिश्रम घेतले.
मागील वर्षी ३५ फुटांच्या रावणाचे दहन झाले होते. यंदा १० फुटाने वाढ करण्यात आली आहे.
नवचंडी यागाची शुक्रवारी सांगता झाली. होमहवन, पूजाविधीनंतर अजाबली देण्यात आला. नवचंडी यागाने उपवासाची सांगता झाली. त्यानंतर शुक्रवारी दुपारी चार तास महाप्रसादाचे आयोजन केले होते. ९ हजार भाविकांनी याचा लाभ घेतल्याचे विश्वस्तांनी सांगितले.
दरम्यान, शनिवारी पहाटे तीन वाजता डॉ.अनिल बारकुल यांच्या हस्ते महापुजा होईल.
त्यानंतर दर्शनासाठी मंदिर भाविकांसाठी खुले केले जाणार आहे.
नवरात्र महोत्सवात विविध वस्तूंसह मनोरंजनाचे खेळ आणि खाद्य पदार्थांचे स्टॉल लागले होते.
या कालावधीत दररोज हजारो भाविकांनी जत्रेचा आनंद लुटल्याचे पहावयास मिळाले. यात आबालवृद्धांचा सहभाग होता.