अडीच महिन्यांपासून पन्नास शिक्षक गायब
By Admin | Published: September 20, 2016 12:16 AM2016-09-20T00:16:47+5:302016-09-20T00:22:08+5:30
औरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीने (आपसी) अन्य जिल्ह्यांतून आलेल्या शिक्षकांपैकी सुमारे ५० शिक्षक गेल्या अडीच महिन्यांपासून शाळेत रुजूच झालेले नाहीत.
औरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीने (आपसी) अन्य जिल्ह्यांतून आलेल्या शिक्षकांपैकी सुमारे ५० शिक्षक गेल्या अडीच महिन्यांपासून शाळेत रुजूच झालेले नाहीत. रेकॉर्डवर शिक्षक दिसतात; मात्र ते प्रत्यक्षात शाळेत गेलेलेच नाहीत. परिणामी शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि पालकांकडून शिक्षकांच्या मागणीमुळे शिक्षण विभाग सध्या जेरीस आला आहे.
जिल्हा परिषदेत सध्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न स्फोटक बनला आहे. आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना रुजू करून घ्यावे, अशी मागणी करणाऱ्या शिक्षकांनी एक नवी संघटनाही स्थापन केली आहे. काही जि. प. सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचाही प्रयत्न या शिक्षकांनी केलेला आहे. अलीकडच्या काळात शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदलीने (आपसी) जाणाऱ्या शिक्षकांना नाहरकत प्रमाणपत्र दिले. त्यानंतर त्यांच्या जागेवर येणारे शिक्षक त्या- त्या जिल्ह्यांतून कार्यमुक्त झाले. त्यांच्या जागांवर येथून गेलेले शिक्षक तिकडे रुजूही झाले. मात्र, येथे आलेल्या शिक्षकांपैकी जवळपास ५० पेक्षा जास्त शिक्षक अद्यापही जि. प. शाळांमध्ये रुजू झालेले नाहीत.
ठिकठिकाणच्या जि. प. शाळांतील शालेय समितीचे सदस्य, अनेक ग्रामस्थ व पालकांनी शिक्षण सभापती विनोद तांबे, शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांची भेट घेऊन शिक्षक देण्याची मागणी केली. शिक्षक दिला नाही तर शाळेला कुलूप लावण्याचा इशाराही दिला. तेव्हा कुठे हा प्रकार समोर आला. आंतरजिल्हा बदलीने औरंगाबाद जिल्ह्यात आलेल्या या शिक्षकांना सोयीची शाळा हवी आहे. आपसी बदलीने आलेल्या शिक्षकांना येथून गेलेल्या शिक्षकांच्याच शाळेत अध्यापन करणे बंधनकारक आहे. पण, या शिक्षकांनी सोयीची शाळा मिळण्यासाठी सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत ‘फिल्ंिडग’ लावल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी सांगितले की, आंतरजिल्हा बदलीने (आपसी) आलेल्या शिक्षकांनी मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होणे गरजेचे आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून हे शिक्षक शाळेवर रुजूच झालेले नाहीत, ही गंभीर बाब आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी त्या शिक्षकांना नोटिसा बजवाव्यात. त्यानंतरही ते जर शाळेत हजर झाले नाहीत, तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. उद्या मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत आवाज उठविणार आहे, असेही तांबे म्हणाले.