लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पावणेतीन हजार पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:02 AM2021-03-31T04:02:11+5:302021-03-31T04:02:11+5:30
औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील कोरोनारुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने मंगळवारी मध्यरात्रीपासून ते ९ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन पुकारला ...
औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील कोरोनारुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने मंगळवारी मध्यरात्रीपासून ते ९ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन पुकारला आहे. या कालावधीत विनापरवानगी कोणत्याही नागरिकाला घराबाहेर पडता येणार नाही. कोरोना विषाणूची शृंखला तोडण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःहून लॉकडाऊन पाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आले. हा १० दिवसांचा लॉकडाऊन अत्यंत कडक व्हावा याकरिता पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. लॉकडाऊनमध्ये विनाकारण एकही व्यक्ती घराबाहेर पडणार नाही याची खबरदारी पोलीस घेणार आहेत. याकरिता पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ६२ तपासणी नाके असतील. प्रत्येक नाक्यावर एक पोलीस अधिकारी, आठ ते दहा कर्मचारी तैनात केले जात आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या विविध ब्रँचचे अधिकारी, कर्मचारी यांना राखीव स्ट्रायकिंग फोर्स म्हणून तैनात ठेवले जाईल. छावणी, सिडको, सिटी चौक, आणि उस्मानपुरा साहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासोबत दंगल नियंत्रण पथक (आरसीपी), यासोबतच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार चाकी आणि ३४ दुचाकी गस्तीवर असतील. पोलीस नियंत्रण कक्षाच्या ९ पीसीआर कार रात्रंदिवस गस्तीवर असतील, अशी माहिती विशेष शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त अशोक बनकर यांनी दिली.
=============
ग्रामीण पोलिसांची जय्यत तयारी
औरंगाबाद ग्रामीणमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी जय्यत तयारी केली. उपलब्ध पोलीस बलाच्या (७५ टक्के) १२०० अधिकारी, कर्मचाऱ्यांना बंदोबस्तावर नेमले आहे. जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्रामस्थांना सोबत घेऊन लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाईल. प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा समिती स्थापन केली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक गोरख भामरे, ४ पोलीस उपअधीक्षक आणि अन्य अधिकारी जिह्यात गस्तीवर असतील.
===========
कोट
कोरोना संसर्ग सध्या प्रचंड वाढला आहे. हा संसर्ग अधिक पसरल्यास रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार नाहीत. यामुळे ३० मार्चच्या रात्रीपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. नागरिकांनी घरात राहावे आणि पोलिसांना सहकार्य करावे.
=====
- मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण.