कोरोनाविरुद्धचा लढा व्यक्तिकेंद्रित नसून जनतेच्या सहकार्याशिवाय यश मिळणार नाही : आस्तिककुमार पाण्डेय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 06:52 PM2020-07-15T18:52:38+5:302020-07-15T19:06:32+5:30

लॉकडाऊन वाढविल्यासंदर्भात आणि शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात आस्तिककुमार पाण्डेय यांनी ‘लोकमत’जवळ सविस्तर भूमिका मांडली. कोरोनाचा आजार, त्याची लक्षणे आणि त्याची तीव्रता यासंदर्भात सातत्याने बदल होत आहेत, या बदलाच्या अनुषंगाने आपण कोणत्या उपाययोजना अंमलात आणत आहोत, याचे सविस्तर विवेचन त्यांनी केले.

Fight against Corona is not person-centered and will not be successful without people's cooperation: Astik Kumar Pandey | कोरोनाविरुद्धचा लढा व्यक्तिकेंद्रित नसून जनतेच्या सहकार्याशिवाय यश मिळणार नाही : आस्तिककुमार पाण्डेय 

कोरोनाविरुद्धचा लढा व्यक्तिकेंद्रित नसून जनतेच्या सहकार्याशिवाय यश मिळणार नाही : आस्तिककुमार पाण्डेय 

googlenewsNext

- नजीर शेख  

औरंगाबाद : कोरोनाविरुद्धचा लढा हा काही व्यक्तिकेंद्रित नाही. मी किंवा इतर दोन-चार अधिकारी यांच्यामुळे हा लढा यशस्वी होणार नाही. जनता आणि लोकप्रतिनिधींचा पाठिंबा यासाठी आवश्यकच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी किंवा त्याबाबतच्या उपाययोजना अमलात आणण्यासंदर्भात इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्याचवेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या काही सूचनाही असतात. या सूचनांचे उल्लंघन झाल्यास केंद्राची टीम येथे येऊन पाहणी करू शकते. यामुळे त्या सूचनांना आम्ही बांधील आहोत, असे महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्पष्ट केले.  

औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात मागील चार महिन्यांत कोरोनाचा आलेख सातत्याने वाढत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९,०६५ इतकी झाली आहे, तर ३६४  एवढे नागरिक मृत्यू पावले आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने शहरात आणि वाळूज महानगर परिसरात १० ते १९ जुलैपर्यंत पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊन वाढविल्यासंदर्भात आणि शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात आस्तिककुमार पाण्डेय यांनी ‘लोकमत’जवळ सविस्तर भूमिका मांडली. कोरोनाचा आजार, त्याची लक्षणे आणि त्याची तीव्रता यासंदर्भात सातत्याने बदल होत आहेत, या बदलाच्या अनुषंगाने आपण कोणत्या उपाययोजना अंमलात आणत आहोत, याचे सविस्तर विवेचन त्यांनी केले.

काय आहे परिस्थिती?
आज कोरोनाच्या आजारासंदर्भात विविध तज्ज्ञ आपली मते मांडत आहेत. ही मते अगदी ‘ग्रासरूट’पर्यंत येण्यामध्ये काही वेळ जातो. कोरोनाचा विषाणू बदलत आहे. आजाराच्या लक्षणांमध्येही बदल होत आहेत. त्याची तीव्रता बदलत आहे. मागील चार महिन्यांत आम्ही पाहिले आहे की, ज्याठिकाणी कोरोनाचा प्रसार नव्हता तिथे आता कोरोनाने आपले हातपाय पसरले आहेत. शहर किंवा गाव किती खुले आहे, त्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव अवलंबून आहे. मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद ही आणि इतर मोठी शहरे खुली राहिल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. जालना आणि बीडमध्ये कोरोना नव्हता. मात्र, नंतर तिथेही तो पसरला. तिसरा भाग ग्रामीण, या भागामध्ये आगाऊपणा कमी असल्याने आणि नागरिकांचे अलगीकरण असल्याने तिथे या आजाराचा प्रादुर्भाव कमी आहे. मालेगाव, नाशिक, नागपूर मुक्त झाले, असे म्हणत औरंगाबाद शहरावर खूप टीका करण्यात आली. आता या तिन्ही शहरांतही रुग्ण वाढत आहेत. कुणाचीही दिशाभूल होऊ नये म्हणून मी हे सांगत आहे. 

का केले पुन्हा लॉकडाऊन? 
मागील तीन महिन्यांपासून या आजारासंदर्भात उपाययोजना करण्यासंदर्भातील आपली परिस्थिती सतत बदलत आहे. या तीन महिन्यांच्या काळात आपल्या शहराची काय परिस्थिती राहिली, याचा विचार आम्ही केला आहे. ज्याप्रमाणे नवीन संशोधन, नवीन तंत्र विकसित होत आहे, त्याप्रमाणे आपणही बदलत गेलोे आहोत. पहिल्या लॉकडाऊननंतर आता आपण पुन्हा एकदा लॉकडाऊनपर्यंत आलो आहोत. लॉकडाऊन हा उपाय नाही, हे आम्हालाही कळत आहे. मात्र, लॉकडाऊन केल्यामुळे रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होते. गेल्या काही दिवसांत शहरासह ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वाढत चालली आहे. कोणत्याही रुग्णाला चांगली वैद्यकीय सुविधा मिळाली पाहिजे, याची काळजी प्रशासन म्हणून आम्हाला घ्यावी लागेल. सद्यस्थितीत आपल्याकडे पुरेसे बेड आणि सुविधा आहेत. मात्र  रुग्णसंख्या वाढत गेल्यास  बेड आणि इतर वैद्यकीय आणि मूलभूत सुविधा कमी भासू लागतील. ही बाब लक्षात घेऊन आम्ही पुन्हा लॉकडाऊन केले आहे.

लॉकडाऊनमध्ये आम्ही काय करीत आहोत
सध्या लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात म्हणजे १८ जुलैपर्यंत आम्ही निसटलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर उपचार करून त्यांचे प्राण वाचविण्याचे काम आम्ही प्राधान्याने करीत आहोत. यासाठी अँटिजन टेस्ट घेणारी टीम काम करीत आहे. जिथे पॉझिटिव्ह पेशंट आहे तिथे ९ आणि शहराच्या सीमेवर आणि रेल्वेस्टेशनवर सहा टीम २४ तास काम करीत आहेत. या कामाचे परिणाम खूप चांगले आहेत. एप्रिल महिन्यात आपल्याकडे ६० रुग्ण होते. मे महिन्यात ही संख्या १०० च्या आसपास पोहोचली. जून महिन्यात ग्रामीण भागात रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढली. लॉकडाऊननंतर महिना-दोन महिन्यांनी कदाचित आजच्या सारखीच स्थिती असेल. मात्र, त्यावेळी लॉकडाऊनची गरज भासणार नाही. कदाचित जानेवारीपर्यंत कोरोनावरील औषध उपलब्ध असण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमध्ये कोरोना रुग्णांची साखळी मात्र तुटणार आहे.

कोणत्या सुविधा निर्माण केल्या 
कोरोनाविरुद्धची लढाई ही शंभर मीटरची लढाई नसून, ती मॅरेथॉन आहे, हे आमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगत असतो. सध्या डीसीएच (डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल), डीसीएचसी (डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर) निर्माण केले आहेत. यापैकी डीसीएचसीची जबाबदारी महापालिकेने घेतली आहे. सद्य:स्थितीत ४,००० इन्स्टिट्यूशनल बेड आणि २,००० ट्रिपल सी बेड उपलब्ध आहेत. याशिवाय महापालिकेचे अधिकारी,  वॉर्ड अधिकारी, महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी, तहसीलदार महापालिकेच्या मदतीला आहेत. शिवाय महापालिकेचे ४०० कर्मचारी काम करीत आहेत. या सर्वांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करीत आहोत. २४ बाय ७ कंट्रोल रूम आम्ही उभी केली आहे. महसूल विभागाच्या अधिकारी अ‍ॅलिस पोरे यांच्या नेतृत्वात याठिकाणी अनेक जण काम करीत आहेत. रुग्णासंबंधी केव्हाही माहिती येत असते. त्याप्रमाणे सर्व यंत्रणा हलविण्याचे काम या ठिकाणाहून होते. रुग्णांसाठी आणि क्वारंटाईन झालेल्यांसाठी पहिल्या टप्प्यात भोजनामध्ये कमी पडलो. नंतर महापालिकेने स्वत:चे किचन तयार केले; परंतु ते कामही जिकिरीचे ठरले. मात्र, आता भोजनाचे कंत्राट एकाच कंत्राटदाराला न देता ते विभागून देण्यात आले आहे. त्यामुळे ते आता सुरळीत आहे. 

‘त्रिसूत्री’नुसार मनपाचे काम ; ‘स्पेशल टास्क फोर्स’ तयार
कोरोनासंदर्भातील उपायोजनांमध्ये आपण चार प्रकारचे लोक शोधत आहोत. त्यासाठी महापालिकेच्या विधि अधिकारी अपर्णा थेटे यांच्या नेतृत्वाखाली आपण एप्रिल महिन्यातच ‘स्पेशल टास्क फोर्स’ निर्माण केला आहे. असा ‘टास्क फोर्स’ मुंबई, पुणे, नाशिक येथेही नाही. या टास्क फोर्ससाठी आपण स्मार्ट सिटीचे रिसोर्सेस वापरत आहोत. स्मार्ट बसेसही वापरत आहोत. या टास्क फोर्समध्ये एक डॉक्टर, एक लॅब टेक्निशियन आणि एक डाटा एंट्री आॅपरेटर यांचा समावेश आहे. टास्क फोर्समध्ये रुग्णाचा कोविड आयडी निर्माण होतो. त्यानुसार आपण पुढे रुग्णाला ‘ट्रॅक’ करीत राहतो. याशिवाय तीन पातळ्यांवर (त्रिसूत्री) आपण काम करीत आहोत. 
फिवर क्लिनिक : शहराच्या विविध भागांत १४  फिव्हर क्लिनिक आपण निर्माण केले आहेत. यामधून आपण रुग्णांची ‘स्क्रीनिंग’ करतो. 
कॉन्टॅक्ट मॅपिंग: कॉन्टॅक्ट मॅपिंग पद्धत वापरून पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांंना पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येते. 
मोबाईल अ‍ॅप आणि कोरोना वॉर रूम : महापालिकेने एमएचएमएच हे अ‍ॅप तयार केले आहे. कोरोनासंदर्भात असे अ‍ॅप आतापर्यंत कुणीही तयार केलेले नाही. या अ‍ॅपमध्ये केंद्र सरकारच्या ‘आरोग्य सेतू’अ‍ॅपमधून येणारा डेटा संकलित केला जातो. अ‍ॅपच्या माध्यमातून ‘डेटा’ कोरोना वॉर रूममध्ये येतो. तिथे दहा  आॅपरेटर नेमले आहेत. याठिकाणी संशयितांची तीन प्रकारची माहिती येते. डेटानुसार आणि व्यक्तीच्या   प्रकृतीनुसार आॅपरेटर रुग्णाशी संपर्क करून विचारणा करतात. ‘डेटा’ खरा असेल, तर याठिकाणी नेमलेले तज्ज्ञ डॉक्टर त्या व्यक्तीला प्रश्न विचारतात आणि त्या व्यक्तीच्या उत्तरानुसार त्याला पुढील उपचार किंवा वैद्यकीय सेवेबाबत कार्यवाही करण्यात येते.

सोशल मीडियावरही ‘अ‍ॅक्टिव्ह’
आस्तिककुमार पाण्डेय हे सोशल मीडियावरही सक्रिय आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रशासनातर्फे उचलण्यात येणाऱ्या पावलांसंबंधी ते जनतेला माहिती देत आहेत. बेडची उपलब्धता, एमएचएमएच  अ‍ॅपमधील डाटा, कोरोना उपाययोजनेसंदर्भातील बैठका, अँटिजन टेस्ट आणि इतर अनेक उपयुक्त माहिती ते आपल्या ‘टिष्ट्वटर’ अकाऊंटवरून देत असतात. ‘एमएचएमएच’ हे अ‍ॅप सर्वांनी डाऊनलोड करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

लॉकडाऊनचा नागरिकांनी केला सन्मान
शहरात दुसऱ्यांदा लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा नागरिकांनी खूपच सन्मान केला आहे. नागरिकांनी स्वत:हून शिस्त पाळली  आहे. लोक घरातच बसले आहेत. पोलीस अहोरात्र परिश्रम घेत  आहेत. पोलिसांचेही काम अभिनंदनीय आहे. नागरिकांच्या या सहकार्याच्या बळावरच आपण कोरोनावर मात करू शकू. 

औरंगाबादमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे
औरंगाबादमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत  असल्यामुळे आम्हाला इतर शहरांची उदाहरणे द्यायचा प्रयत्न झाला. मात्र आम्ही आमच्या परीने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मोठे प्रयत्न करीत आहोत. यासाठी एक पद्धतशीर नियोजन आहे. औरंगाबाद हे एक स्मार्ट शहर आहे. कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करण्यासाठी औरंगाबाद शहरातील नागरिकांमध्ये ‘सेल्फ कॉन्फिडन्स’ निर्माण करणे गरजेचे आहे.

Web Title: Fight against Corona is not person-centered and will not be successful without people's cooperation: Astik Kumar Pandey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.