हा लढा धर्माच्या ठेकेदारांविरुद्ध - प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 06:21 PM2018-12-15T18:21:49+5:302018-12-15T18:25:26+5:30
सेवेकऱ्यांच्या पदरात काहीच पडू नये, याची काळजी धर्माचे ठेकेदार घेत असतात.
औरंगाबाद : सेवेकरी असलेला ओबीसी समाज सत्ताधारी बनला पाहिजे. आलुतेदार- बलुतेदार सत्तेत आला पाहिजे. लहानातल्या लहान ओबीसी समाजाच्या पदरात काही तरी पडले पाहिजे. सेवेकऱ्यांच्या पदरात काहीच पडू नये, याची काळजी धर्माचे ठेकेदार घेत असतात. म्हणून हा लढा धर्माच्या ठेकेदारांविरुद्धचा आहे, असे स्पष्ट प्रतिपादन शुक्रवारी येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते तापडिया नाट्यमंदिरात आयोजित ओबीसी हक्कपरिषदेचे उद्घाटन करताना बोलत होते. २ आॅक्टोबरच्या जबिंदा लॉन्सवरील वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेत अर्जुन महाराज पांचाळ यांनी भाषण केले. त्यानंतर त्यांना त्रास दिला, हा धागा पकडून ते बोलत होते.
यावेळी अर्जुन महाराज पांचाळ, हरिभाऊ भदे, सोपानराव डोईफोडे, प्रा. किशन चव्हाण, दादाराव पांचाळ, अंबादास रगडे, अमीन जामगावकर, टी.एस. चव्हाण, राम पेरकर, अॅड. महादेव आंधळे, ग.ह. राठोड, राजपालसिंग राठोड, प्रा. सुदाम चिंचाणे आदींची भाषणे झाली. अॅड. आंबेडकर यांच्या आधी अध्यक्षीय समारोपात अॅड. शरदश्चंद्र वानखेडे यांनी नऊ ठराव वाचून दाखवले व ते मंजूर झाले. पंडित बोर्डे यांनी सूत्रसंचालन केले, तर विसपुते यांनी आभार मानले.
यावेळी अॅड. बी.एच. गायकवाड यांनी वकिलांच्या एका शिष्टमंडळासह निवेदन सादर केले. अॅड. आंबेडकर यांचा सत्कार एका मोठ्या पुष्पहारात करण्यात आला. सभास्थानी ते येताच फटाक्यांची आतषबाजी केली. भारत खोगरे, प्रकाश विसपुते, दीपक राऊत, अब्दुल रऊफ, सुभाष वानखेडे, आजीनाथ जाधव, सुरेश चव्हाण आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. मंचावर अमित भुईगळ, प्रा. माणिक कांबळे, रविकांत राठोड, मनोज घोडके, निशांत पवार आदी उपस्थित होते.
मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नसल्याचे अॅड. आंबेडकर यांनी सांगितले. ते म्हणाले, मंडल आयोगाने जो एसईबीसी उभा केला, तो गु्रप १ आणि देवेंद्र फडणवीस यांनी जो एसईबीसी मराठा (कुणबी) उभा केला, तो ग्रुप २, असे वर्गीकरण करून मराठा समाजाला आरक्षण दिले असते, तर ते कदाचित न्यायालयात टिकले असते. मात्र, फडणवीसांनी तसे केले नाही. त्यांची नियत साफ दिसत नाही. ते फसवेगिरी करीत आहेत. मराठा आरक्षणामुळे आपले आरक्षण संपले, अशी भावना आता ओबीसींमध्ये निर्माण झाली आहे. ओबीसी नेत्यांच्या म्हणण्यात मला तथ्य दिसत आहे, अशीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.