लढवय्या विद्यार्थी कार्यकर्त्याची मृत्यूशी झुंज अपयशी, भावांसह बहिणीने दिला अग्निडाग
By विजय सरवदे | Published: September 22, 2023 12:36 PM2023-09-22T12:36:37+5:302023-09-22T12:38:13+5:30
या संपूर्ण आजारपणात सावलीसारखी सोबत असलेली बहीण श्रद्धा हिने यावेळी अत्यंत धीराने आपल्या भावांसोबत अमोलच्या पार्थिवाला अग्निडाग दिला.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील लढवय्या विद्यार्थी कार्यकर्ता अमोल खरात (वय ३४) याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपशयी ठरली. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा माजी राज्याध्यक्ष अमोल खरात हा मागील काही दिवसांपासून मेंदूच्या ‘न्युरो ऑटोइम्यून’ या दुर्मीळ आजाराने त्रस्त होता. उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
त्याच्या पश्चात वडील, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्याच्या या संपूर्ण आजारपणात सावलीसारखी सोबत असलेली बहीण श्रद्धा हिने यावेळी अत्यंत धीराने आपल्या भावांसोबत अमोलच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. मूळगाव केहाळा (ता. जिंतूर, जि. परभणी) येथे नातेवाईक, विद्यार्थी, चळवळीतील कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत गुरुवारी दुपारी दोन वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अमोल हा विद्यापीठाच्या इतिहास विभागातील संशोधक विद्यार्थी होता. त्याला नुकतीच फेलोशिपही मिळाली होती. सहा महिन्यांपूर्वी अमोल खरात याच्या नेतृत्वाखालीच बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांचे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन झाले. तब्बल पन्नास दिवस चाललेल्या या आंदोलनानंतर राज्य सरकारने सर्व आठशे संशोधक विद्यार्थ्यांना बार्टीची फेलोशिप लागू केली. विद्यापीठाशी संबंधित आंदोलनांमध्ये तसेच परिवर्तनवादी चळवळीत तो कायम अग्रेसर असायचा. अमोलच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे समजल्यावर ‘लोकमत’ने त्याच्या मदतीसाठी आवाहन केले होते. त्यानुसार अनेकांनी त्याला आर्थिक मदतही केली होती.
मदतीसाठी अनेकांचे हात सरसावले पण...
शैक्षणिक तथा सामाजिक क्षेत्रात अमोल कायम अग्रभागी राहून आंदोलनात सक्रीय होता. मेंदूवरील दुर्मिळ आजारावर उपचारासाठी लागणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील ३० इंजेक्शनसाठी मोठा खर्च येणार होता. त्याच्या या आजारपणाची माहिती ‘लोकमत’च्या डिजिटल आणि प्रिंटच्या अंकातून मिळताच अनेकांनी मदतीचे आवाहन केले. अनेकांनी मदतीसाठी धाव घेतल्याने तत्काळ उपचार सुरू झाले. तो उपचारास प्रतिसाद देत असल्याने सर्वांना हायसे वाटले. बुधवारी दुपारी देखील त्याची प्रकृती समाधानकारक होती. मात्र रात्री साडेअकरा वाजता त्याची प्रकृती अचानक बिघडली. डॉक्टरांनी अमोलला आयसीयू मध्ये दाखल केले. येथेच गुरुवारी पहाटे दोन वाजता या लढवायची आजारासोबत सुरू असलेली झुंज संपली.
राज्यभरातून चळवळीतील कार्यकर्ते केहाळाकडे
उपचार सुरु असताना लढवय्या अमोलचे अचानक निधन झाल्याचे समजताच अनेकांना धक्का बसला. वार्ता समजताच गुरुवारी पहाटे घाटी रुग्णालयात कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. त्यानंतर जसे जमेल तसे विद्यार्थी, प्राध्यापक, चळवळीतील कार्यकर्त्यांनी अंत्यसंस्काराठी केहाळा गाव गाठले. दुपारी दोन वाजे दरम्यान त्याच्यावर रिमझिम पावसात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेकांना आपल्या भावना अनावर झाल्या. राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी अमोल खरात अमर रहे , जय भीम, लाल सलामचा जयघोष करत त्याला अखेरची सलामी दिली. दरम्यान, अत्यंत कमी वयात केलेल्या अमोलच्या कार्याची, आंदोलनातील सहभागाची आठवण सांगणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्या आहेत.