पाटबंधारे विभागातील संचिका गायब !
By Admin | Published: February 27, 2017 12:37 AM2017-02-27T00:37:41+5:302017-02-27T00:38:29+5:30
लातूर : पाटबंधारे विभाग क्र. १ च्या तेरणा वसाहतीतील रेकॉर्ड रुममधून महत्त्वाचे दस्तावेज चोरीला गेले आहेत
लातूर : पाटबंधारे विभाग क्र. १ च्या तेरणा वसाहतीतील रेकॉर्ड रुममधून महत्त्वाचे दस्तावेज चोरीला गेले आहेत. निलंगा, औसा आणि लातूर तालुक्यांतील साठवण तलावाचे दस्तावेज त्यात होते. नकाशे, ब्ल्यू प्रिंट आणि अन्य कागदपत्रांचे ४६ दस्ते व अभिलेखांच्या फायली चोरीला गेल्याने पाटबंधारे विभागात खळबळ उडाली आहे.
औसा रोड परिसरात तेरणा वसाहत असून, या वसाहतीतील रेकॉर्ड रुममध्ये पाटबंधारे विभाग क्र. १ च्या कार्यालयाअंतर्गत असलेल्या कामकाजाचे रेकॉर्ड ठेवण्यात आले होते. संदर्भासाठी या फायली वारंवार लागत असत. मात्र अचानक १८ ते १९ फेब्रुवारी दरम्यान रेकॉर्ड रुमचे लॉक तोडून चोरट्यांनी त्यातील ४६ दस्ते व मूळ अभिलेखांच्या फायली चोरल्या आहेत. या फायलींमध्ये नकाशे व अन्य कागदपत्रांचा समावेश आहे. औसा, निलंगा आणि लातूर तालुक्यांत झालेल्या साठवण तलावासंदर्भातील कागदपत्रे या रेकॉर्ड रुममध्ये होती. ५२ दस्ते होते. त्यापैकी ४६ दस्तावेज चोरीला गेले आहेत. लघु पाटबंधारे विभागाकडून पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरीत झालेली कागदपत्रे त्यात असल्याचे कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
१९८० पासूनचे रेकॉर्ड या दस्तावेजात होते. त्याची नेमकी चोरी का केली असावी? कोणी केली असेल, असा प्रश्न काही कर्मचाऱ्यांसह प्रमुखांना पडला आहे. १८ ते १९ फेब्रुवारी दरम्यान रेकॉर्ड रुमचे कुलूप तोडून चोरी झाली. मात्र या प्रकरणाची फिर्याद २३ फेब्रुवारीला देण्यात आली. त्यानंतर पोेलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. परंतु, तपासाला अद्याप सुरूवात नाही. (प्रतिनिधी)