शिवसैनिकांची किरीट सोमय्यांविरोधात पोलिसात तक्रार; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 01:10 PM2022-04-07T13:10:45+5:302022-04-07T13:12:30+5:30
गुन्हा दाखल झाल्याशिवाय पोलीस ठाणे सोडणार नसल्याची शिवसैनिकांची भूमिका
औरंगाबाद: आयएनएस विक्रांत मदत निधीमधून भाजपच्या ( BJP ) किरीट सोमय्यांनी (Kirit Somayya ) ५८ कोटी रुपये जमा केले असून ही रक्कम कुठेही जमा केली नाही, त्याचा हिशोबही देण्यात आला नाही. त्यावेळी सोमय्यांकडे ५ हजार रुपये जमा केलेला साक्षीदार आमच्याकडे आहे, याप्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये शिवसेना ( Shiv Sena ) नेते चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) यांनी दिली आहे. याप्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाले असून गुन्हा दाखल झाल्याशिवाय ठाणे सोडणार नसल्याची भूमिका घेतली आहे.
भाजपच्या किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसैनिकांनी राज्यात विविध भागात आज सकाळी आंदोलन केले. औरंगाबादेतही क्रांती चौकात शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन करत विक्रांत बचाव निधीत अपहार प्रकरणी सोमय्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाध्यक्ष नरेंद्र द्विवेदी, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह शिवसैनिकांनी क्रांती चौक पोलीस ठाणे गाठले.
येथे माजी खासदार आणि शिवसेना नेते खैरे यांनी, किरीट सोमय्या यांच्याकडे आयएनएस विक्रांतसाठी ५ हजार रुपये जमा केल्याचा साक्षीदार जिल्हाध्यक्ष नरेंद्र द्विवेदी आहेत. अशा प्रकारे सोमय्यांनी जवळपास ५८ कोटी रुपये जमा केले. ही रक्कम राजभवनात जमा केली नाही, याचा कसलाही हिशोब देण्यात आला नाही. या निधीत अपहार झाल्याचा आरोप करत याप्रकरणी सोमाय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार पोलीस ठाण्यात दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष नरेद्र द्विवेदी यांनी त्यावेळी सोमय्यांकडे ५ हजार रुपये मदत निधी दिल्याचा दावा केला.
भाजपच्या किरीट सोमाय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.. pic.twitter.com/047amxzzMf
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) April 7, 2022
दरम्यान, खैरे यांनी गुन्हा दाखल केल्याशिवाय शिवसैनिक पोलीस ठाणे सोडणार नसल्याची भूमिका घेतली आहे. मागील अर्ध्या तासांपासून शिवसैनिक ठाण्यात ठिय्या देऊन आहेत. तर पोलिस आयुक्तांशी चर्चा करून पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक दराडे यांनी दिली.