पाचपट वाढीव दराने मास्क विकणाऱ्या औषधी दुकानदारावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 16:20 IST2021-03-20T16:18:53+5:302021-03-20T16:20:13+5:30
corona virus in Aurangabad ४९ रुपयांचा मास्क २१० रुपयांना, तर ४ रुपयांचा मास्क १० रुपयांना विक्री

पाचपट वाढीव दराने मास्क विकणाऱ्या औषधी दुकानदारावर गुन्हा दाखल
औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एन-९५ मास्क आणि थ्री लेअर मास्कची विक्री पाचपट दराने करून रुग्णांची लूट करणाऱ्या सिडको एन-६ येथील मेडिकोव्हर हॉस्पिटलमधील औषधी दुकानावर अन्न व औषधी प्रशासन विभागाने कारवाई केली. औषधी निरीक्षकाने केलेल्या तपासणीत मास्क विक्रीत रुग्णांची फसवणूक केली जात असल्याचे समोर येताच शुक्रवारी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अभिषेक दीपक जैन, प्रतीक मधुकर घोडके, विनय प्रभाकर बोरसे आणि सचिन बोरसे, अशी आरोपींची नावे आहेत. अन्न व औषधी प्रशासनाचे औषधी निरीक्षक राजगोपाल मूलचंद बजाज यांनी ६ आणि ७ मार्च रोजी सिडको एन-६ येथील सहृदय हेल्थ केअर प्रा. लिमिटेड संचालित मेडिकोव्हर हॉस्पिटलमध्ये असलेल्या औषधी दुकानाची अचानक तपासणी केली. तेव्हा तेथे उपस्थित असलेले आरोपी हे रुग्ण ग्राहक आणि त्यांच्या नातेवाइकांना एन-९५ हे मास्क शासनाने ठरवून दिलेल्या ४९ रुपये विक्री किमतीऐवजी २१० रुपयांना, तर साधे थ्री लेअर ४ रुपये विक्रीचे मास्क १० रुपयांना विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्यांनी केलेल्या तपासणीत आरोपींनी ५ हजार १२० थ्री लेअर मास्कची विक्री करून ३० हजार ७२० रुपये अतिरिक्त उकळले, तर एन-९५ मास्क २१० रुपये दराने विकून १ लाख ४६ हजार ९९३ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी सहआयुक्त संजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सिडको पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.
एन-९५ मास्क ४९ रुपयांत विकणे बंधनकारक
शासनाने एन-९५ आणि थ्री लेअर सर्जिकल मास्कचे दर निश्चित केले आहेत. यामुळे औषधी दुकानदारांनी एन-९५ मास्क ४९ रुपयांना, तर थ्री लेअर मास्क ४ रुपयांत विक्री करणे बंधनकारक आहे. यापेक्षा अधिक दराने कुणी मास्क विकत असेल तर तक्रार करावी.
- राजगोपाल बजाज, औषधी निरीक्षक.