बोजा उतरविण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:04 AM2021-01-22T04:04:47+5:302021-01-22T04:04:47+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश कदम याने महिंद्रा रूरल हाउसिंग फायनान्स कंपनीच्या गंगापूर शाखेकडून घर बांधकामासाठी २१ जानेवारी २०१७ ला ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश कदम याने महिंद्रा रूरल हाउसिंग फायनान्स कंपनीच्या गंगापूर शाखेकडून घर बांधकामासाठी २१ जानेवारी २०१७ ला १ लाख १० हजारांचे कर्ज घेतले होते. कंपनीने गहाणखत करून घेतले होते. या कर्जाची परतफेड वर्ष २०१७ ते २०२२ या कालावधीत सहा महिन्याच्या अंतराने १८,२९५ रुपये याप्रमाणे बारा हप्त्यांमध्ये करण्याचा करारनामादेखील कर्जदार व फायनान्स कंपनीत झाला. दरम्यान, १४ डिसेंबर २०२० पर्यंत गणेश याने फायनान्स कंपनीकडे एक लाख १० हजार ६५४ रुपये इतकी रक्कम जमा केली. ७७,७२२ रुपये इतकी रक्कम त्याला देणे होती. ९ डिसेंबर २०२० रोजी भिवगाव सजाचे तलाठी व्ही. ए. बैनवाड यांनी फायनान्स कंपनीला नमुना नंबर ९ प्रमाणे नोटीस पाठवून कर्जदार गणेश कदम याने मालमत्तेवरील बोजा कमी करण्यासाठी अर्ज केला असल्याचे कळविले. सोबत त्याने कंपनीचे इंग्रजी भाषेतील संपूर्ण कर्ज फेडल्याबाबतचे १९ ऑगस्ट २०२० रोजीचे पत्रसुद्धा जोडले असल्याचा संदर्भ दिला.
----------------
फायनान्स कंपनीने केला खुलासा
याबाबत कंपनीचा काही आक्षेप असल्यास पंधरा दिवसात लेखी कळवावे, असे पत्रात सांगितले. त्यामुळे फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक जगदीश महाले यांंनी १६ डिसेंबर २०२० रोजी सदरीलप्रकरणी तलाठी बैनवाड यांच्याकडे कर्जदाराच्या फेरफार क्रमांक ४४३९ बोजा क्रमांक २२१८ हरकत नोंदवली. यावेळी गणेश याने कर्ज बुडविण्याच्या हेतूने मालमत्तेवरील बोजा उतरविण्यासाठी कंपनीच्या नावाने बोगस शिक्का बनविला आहे. ज्यात कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने सरकारी कार्यालयात खोटे दस्तावेज दाखल केले. त्यामुळे गणेश कदम याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.