कोरोना प्रादुर्भावात कोचिंग क्लासेस चालविणाऱ्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 07:28 PM2021-03-18T19:28:56+5:302021-03-18T19:30:06+5:30
corona virus कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्यामुळे शासनाने सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, मेळावे व सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास प्रतिबंध घातले आहेत.
वाळूज महानगर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाकडे दुर्लक्ष करीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तमा न बाळगता शिकवणीवर्ग चालविणाऱ्या बजाजनगरातील दोन कोचिंग क्लासेसविरुध्द गुरुवारी (दि.१८) पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्यामुळे शासनाने सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, मेळावे व सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास प्रतिबंध घातले आहेत. गुरुवारी (दि.१८) सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पथक बजाजनगरात गस्त घालत होते. बजाजनगरातील मोहटादेवी परिसरातील कृष्णाई कॉम्पलेक्सच्या टेरेसवर विद्यार्थ्यांची गर्दी पोलीस पथकाला दिसली. पोलीस पथकाने टेरेसवर जाऊन चौकशी केली असता हे विद्यार्थी मोरया कोचिंग क्लासेसचे असल्याचे तसेच शिकवणीवर्गासाठी आल्याचे समजले. या ठिकाणी जवळपास ७० ते ७५ विद्यार्थी कोरोनाची तमा न बाळगता एकत्रित दिसून आले.
पोलीस पथकाने मोरया क्लासेसचे संचालक अमोल श्रीराम मोरे (रा.बजाजनगर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. याच ठिकाणी किरण अशोक जाधव (रा. बजाजनगर) हे सुद्धा १५ ते २० विद्यार्थ्यांची खासगी शिकवणी घेत असल्याचे दिसून आले. या दोन्ही संस्थेचे संचालक व शिक्षकाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोना.सोनवणे हे तपास करीत आहे.