अबरार कॉलनीत वीज चोरावर गुन्हा दाखल
By | Published: December 5, 2020 04:06 AM2020-12-05T04:06:43+5:302020-12-05T04:06:43+5:30
अनधिकृत वीज वापर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांनी महावितरणच्या ...
अनधिकृत वीज वापर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांनी महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत.
याच पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन परिसरातील अबरार कॉलनीत वीज चोरी होत असल्याची तक्रार महावितरणकडे प्राप्त झाली होती. त्यावर मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्या आदेशानुसार कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत, छावणी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शंकर चिंचाणे, नक्षत्रवाडी शाखेचे सहायक अभियंता योगेश जाधव, प्रधान तंत्रज्ञ रवींद्र जमधाडे, शेख रियाज यांचे पथक गुरुवारी सकाळी १० वाजता अबरार कॉलनीत पोहोचले. या कॉलनीतील रहिवासी रसूल खान महेबूब खान हा घरगुती वापरासाठी बेकायदेशीरपणे महावितरणच्या लघुदाब वीजवाहिनीवर सर्व्हिस वायर जोडून वीजचोरी करीत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. रसूल खानने तीन खोल्यांच्या घरासाठी विद्युतवाहिनीवर सुमारे ३५ फूट लांबीचे वायर जोडून वीजचोरी केली. खानने दोन वर्षांत सुमारे २१६० युनिटची वीजचोरी केल्याप्रकरणी त्यास १८ हजार ४५० रुपयांचे अनुमानित बिल व २ हजार रुपये तडजोड शुल्क असा दंड आकारण्यात आला आहे. महावितरणचे सहायक अभियंता योगेश जाधव यांच्या फिर्यादीवरून विद्युत कायद्यानुसार छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.