शासकीय जागेवर होर्डिंग लावल्याप्रकरणी प्रिंटींग प्रेस चालकाविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 07:37 PM2019-03-19T19:37:52+5:302019-03-19T19:38:36+5:30
पैठण शहरातील बसस्थानक चौक ते संत ज्ञानेश्वर उद्यान रोडवर लावले होते होर्डिंग
पैठण (औरंगाबाद ) : लोकसभेची आचारसंहिता लागू झालेली असताना राजकीय नेत्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे डिजिटल फ्लेक्स व होर्डिंग शासकीय जागेवर लावल्या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात फ्लेक्स ची छपाई करणाऱ्या दुकानदारा विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू असतांना पैठण येथील नगर परिषदेच्या शासकीय जागेवर भाजपा चे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांना शुभेच्छा देणारे फ्लेक्स लावल्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग केला म्हणून पैठण पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैठण शहरातील बसस्थानक चौक ते संत ज्ञानेश्वर उद्यान रोडवर नगरपरिषदेच्या रस्त्यावरील विद्युत खांबावर खा. रावसाहेब दानवे यांच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देणारा डिजिटल बोर्ड लावण्यात आलेले होते. नपचे मुख्याधिकारी तथा आचारसंहिता कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव यांना या बाबत माहिती मिळताच त्यांनी पथकासह पाहणी केली असता रस्त्यावरील खांबावर ११ डिजिटल फ्लेक्स लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. पथकातील अश्विन गोजरे, अशोक पगारे व पाटीलबा घुले व कर्मचाऱ्यांनी हे फ्लेक्स काढुन जप्त केले.
याबाबत न प चे लिपिक अश्विन गोजरे यांनी पैठण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित योगेश टेकाळे याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.