हुंड्यासाठी लग्न मोडल्याने तरुणासह नातेवाइकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:04 AM2021-07-04T04:04:36+5:302021-07-04T04:04:36+5:30

औरंगाबाद : साखरपुड्यानंतर लग्नाची तारीख ठरल्यामुळे वधूकडील मंडळींनी लग्नाची सर्व तयारी केली, पत्रिका वाटप केल्या, असे असताना नवरदेवासह त्याच्या ...

Filing a case against a young man and his relatives for breaking up a marriage for a dowry | हुंड्यासाठी लग्न मोडल्याने तरुणासह नातेवाइकांवर गुन्हा दाखल

हुंड्यासाठी लग्न मोडल्याने तरुणासह नातेवाइकांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

औरंगाबाद : साखरपुड्यानंतर लग्नाची तारीख ठरल्यामुळे वधूकडील मंडळींनी लग्नाची सर्व तयारी केली, पत्रिका वाटप केल्या, असे असताना नवरदेवासह त्याच्या नातेवाइकांनी तुमची मुलगी पसंत नाही, एक लाख रुपये दिले तरच लग्न होईल, असे सांगून लग्न मोडल्याचा प्रकार जयभवानीनगर येथे घडला. वधूपित्याने विनवणी केल्यानंतरही आरोपींनी त्यांना न जुमानता शिवीगाळ करीत धमकावले. याप्रकरणी वधूपित्याने दिलेल्या तक्रारीवरून मुकुंदवाडी ठाण्यात तरुणासह त्याच्या नातेवाइकांवर गुन्हा नोंदविण्यात आला. नवरदेव सागर बाबूराव कोंगळे, त्याचे वडील बाबूराव कोंगळे, त्याची आई आणि दोन बहिणींचा आरोपींमध्ये समावेश आहे.

याविषयी मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार आणि आरोपी एकाच वसाहतीत राहतात. तक्रारदार यांच्या मुलीसाठी स्थळ शोधत होते. आरोपी सागर हा इंजिनिअर असून तो खाजगी कंपनीत नोकरीला आहे. त्याच्या वडिलांनी तक्रारदार यांची भेट घेऊन सागरसाठी त्यांच्या मुलीला मागणी घातली. स्थळ आवडल्याने चार पाहुणे बोलावून लग्नाची बोलणी झाली. तेव्हा लग्न खर्चासाठी ८० हजार रुपये रोख, लग्नात कपडे, भांडे आणि जेवणाची व्यवस्था करून मंगल कार्यालयात लग्न लावून देण्याची मागणी नवरदेवाकडील मंडळींनी केली. २९ नोव्हेंबर २०२० रोजी दोन्हींकडील नातेवाइकांच्या उपस्थितीत साखरपुडा झाला. यावेळी तक्रारदार यांनी नवरदेवाला ३८ हजार ५०० रुपयांची सोन्याची अंगठी आणि कपडे दिले. यावेळी १६ एप्रिल २०२१ ही लग्नाची तारीख काढण्यात आली. लग्नाचा खर्च म्हणून २३ मे रोजी नातेवाइकांसमक्ष ५० हजार रोख देण्यात आले. उर्वरित ३० हजार लग्नाच्या आठ दिवस अगोदर देण्याचे कबूल केले होते. मात्र, लॉकडाऊन सुरू असल्याने लग्नाची तारीख ७ जून रोजी, अशी पुढे ढकलण्यात आली होती. यामुळे तक्रारदार यांनी लग्नाच्या तयारीसाठी नवरदेव मुलाचे कपडे खरेदीसाठी खर्च केला. लग्नात देण्यासाठी संसारोपयोगी भांडी, कपाट खरेदी केले. दरम्यान, २० मे रोजी तरुणीच्या वाढदिवसासाठी सागर आणि त्याचे नातेवाईक तक्रारदार यांच्या घरी गेले. तेव्हा त्यांनी तुमची मुलगी पसंत नाही, तुम्ही लग्नाच्या खर्चासाठी आणखी एक लाख रुपये दिले तरच हे लग्न होईल, असे सांगितले. तक्रारदार यांनी लग्न न मोडण्यासाठी त्यांना विनंती केली. मात्र, आरोपींनी त्यांचे ऐकले नाही. एवढेच नव्हे तर दिलेली रक्कमही परत करणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, अशी धमकी दिल्याने तक्रारदार यांनी मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

Web Title: Filing a case against a young man and his relatives for breaking up a marriage for a dowry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.