पैसे भरुनही वीज जोडणी मिळेना
By Admin | Published: May 19, 2017 12:17 AM2017-05-19T00:17:22+5:302017-05-19T00:18:52+5:30
उस्मानाबाद :एप्रिल-२०१७ अखेर जिल्ह्यातील ४ हजार ३३७ शेतकऱ्यांना पैसे भरूनही वीज जोडणीची प्रतीक्षा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : अत्याधुनिक साधने तसेच ठिबकचा वाढलेला वापर यामुळे कृषी पंप वीज जोडणीची विद्युत वितरण कंपनीकडे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र त्या तुलनेत वीज जोडणी मिळत नसल्याने एप्रिल-२०१७ अखेर जिल्ह्यातील ४ हजार ३३७ शेतकऱ्यांना पैसे भरूनही वीज जोडणीची प्रतीक्षा आहे.
मागील काही वर्षात शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीकडे कल आहे. आधुनिक शेतीमुळे नवनव्या अवजारांचा वापर शेतीमध्ये आवर्जून केला जात आहे. त्याचे थेट फायदेही शेतकऱ्यांना मिळत आहे. मात्र अशा पद्धतीच्या शेतीसाठी शेतशिवारामध्ये वीज असणे आवश्यक असते. विशेषत: मुबलक पाणी असतानाही केवळ कृषी पंपाची वीज जोडणी झालेली नसल्याने अनेकांना शेतीला पाणी देता येत नसल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात सन २०१४ पासून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणीची प्रतीक्षा असल्याचे दिसून येते. २०१४ मध्ये जिल्ह्यातील ५३९ शेतकऱ्यांनी कृषी पंप वीज जोडणीसाठी पैसे भरूनही त्यांना जोडणी मिळालेली नव्हती. २०१४-१५ मध्ये ही संख्या ८४ इतकी होती, तर २०१५-१६ मध्ये या संख्येत अनेक पटीने वाढ झाल्याचे दिसून येते. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात १०३८ शेतकरी वीज जोडणीसाठी पैसे भरूनही विजेची प्रतीक्षा करीत असल्याचे राज्य विद्युत वितरण कंपनीच्या आकडेवारीवरून दिसून येते. ही संख्या २०१६-१७ मध्ये आणखी दुपटीने वाढली. या वर्षात पैसे भरूनही वीज जोडणी न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या २५४० एवढी पोहोचली. चालू वर्षी मात्र कृषी पंप वीज जोडणीकडे विद्युत वितरण कंपनीने काहीसे गांभीर्याने लक्ष दिल्याचे दिसते. एप्रिल अखेरपर्यंत २०१७-१८ मध्ये पैसे भरूनही १३६ शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला वीज जोडणी मिळालेली नाही. याबाबत राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मंडल कार्यालयाशी संपर्क साधला असता, सन २०१४-१५ व मार्च २०१४ पूर्वी पैसे भरूनही काहींना कृषी पंप वीज जोडणी मिळालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कृषी पंप वीज जोडणीसाठी पैसे भरलेल्या काही ग्राहक त्यांनी दिलेल्या पत्त्यावर सापडत नाहीत, तर काही ग्राहकांनी वीज जोडणीची आवश्यकता नसतानाही अर्ज केल्याचे दिसून येते, तर काही ठिकाणी वीज जोडणीसाठी खांब उभे करण्यासाठी गेल्यानंतर स्थानिक लोकांकडून हरकती घेतल्या गेल्याने सदर ग्राहकांना वीज जोडणी देता आली नसल्याचे सांगण्यात आले.