एक मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 10:37 PM2019-02-04T22:37:13+5:302019-02-04T22:37:24+5:30
पाणी टंचाईचा विचार करून जिल्हा परिषदेच्या शाळा १ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी शिक्षक समितीने केली
औरंगाबाद : जिल्ह्यातील भिषण दुष्काळाची स्थिती, पाणी टंचाईचा विचार करून जिल्हा परिषदेच्या शाळा १ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी शिक्षक समितीने केली असून यासंबंधीचे निवेदन समितीच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर व शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांना सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या थंडीच्या दिवसांतच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. दुसरीकडे, अधून- मधून उष्णतेची तीव्रता वाढत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यातील जि.प. शाळा १ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरविण्यात याव्यात. शिक्षणाचा अधिकार या कायद्यानुसार २०० दिवस एवढे शालेय कामकाज अपेक्षित आहे.
दरम्यान, चालू शैक्षणिक वर्षात शालेय कामकाज हे २३५ दिवस होत आहे. त्यामुळे १ मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्यात याव्यात. विद्यार्थ्यांंचा विचार करून याबाबत ठोस निर्णय घेण्यात यावा. निवेदनावर शिक्षक समितीचे राज्य सहसचिव नितिन नवले, मराठवाडा सरचिटणीस शाम राजपूत, शालीकराम खिस्ते, गुलाब चव्हाण, विष्णू भंडारे, के.के. जंगले, रऊफ पठाण, लक्ष्मीकांत धाडबळे, मोहम्मद गौस, सतीश कोळी, मंगला मदने, शिला बहादुरे, वनिता घेर, प्रतिभा राणे, औरंगाबाद तालुका उपाध्यक्ष बबन चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.