बैलांसोबत भरतो ट्रॅक्टरचा पोळा
By Admin | Published: August 24, 2014 11:37 PM2014-08-24T23:37:56+5:302014-08-24T23:54:08+5:30
मदन बियाणी, कनेरगाव नाका शेतकऱ्यांच्या आयुष्यात अतिशय महत्व असलेला पोळा सण कनेरगाव नाका येथे वेगळ्या पध्दतीने साजरा केला जात आहे.
मदन बियाणी, कनेरगाव नाका
शेतकऱ्यांच्या आयुष्यात अतिशय महत्व असलेला पोळा सण कनेरगाव नाका येथे वेगळ्या पध्दतीने साजरा केला जात आहे. बळीराजा वर्षभर रावून ज्या बैलांच्या भरोशावर शेती करतो. त्या बैलांप्रती कृतज्ञता म्हणून पोळा सण साजरा करीत असताना आज बदलत्या काळात बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली असून येथे बैलांसोबत ट्रॅक्टरचा पोळा दरवर्षी भरविल्या जात आहे. या आगळ्या वेगळ्या पोळ्याला उपस्थित राहण्यासाठी लांबून अनेकजण दरवर्षी येत असल्याने हा पोळा कुतूहलाचा विषय बनला आहे.
माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आज बैलांचे श्रम मागे पडले असून त्यांची जागा यांत्रिकीकरणाने घेतली आहे. शेतीमध्ये नांगरणी, वखरणी, पेरणी आदी कामांसाठी बैलांऐवजी ट्रॅक्टरचा वापर ग्रामीण भागात वाढला आहे. सुखी जीवनमान बनविण्यात शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची साथ मिळाल्याने मागील १४ वर्षापुर्वी कै. शरद केशवराव जोशी यांनी ट्रॅक्टर्सचा पोळा भरविण्याची संकल्पना मांडली. तेव्हा एकुण ट्रॅक्टर या पोळ्यामध्ये बैलांसारखे सजवून सहभागी केले. आजमितीला तीस ते पस्तीस ट्रॅक्टर्स त्यामध्ये सहभागी होतात. हा पोळा भरविण्यासाठी शिरीष जोशी, सरपंच डॉ. संतोष गावंडे, रामचंद्र पाटील, नवनाथ गावंडे, बाळू पाटील, गजानन गावंडे, किसन गावंडे आदी परिश्रम घेत असतात. बालाजी गलंडे, महादजी डोळसकर, संदीप गावंडे, गोपाल काळदाते, केशव गावंडे, माधव गावंडे, चंद्रकांत गावंडे, सुरेश बर्वे, विलास बिडवे, विष्णू बाचणवार, राजगुरू, पंढरी वानखेडे, विलासराव गावंडे, बालाजी गावंडे आदी पुढाकार घेत आहेत. पोळ्याच्या दिवशी या ट्रॅक्टसची गावातून मानकऱ्यांच्या हस्ते पुजा झाल्यानंतर मिरवणूक काढली जाते. पोळा संपल्यानंतर घरोघरी बैलाप्रमाणे या ट्रॅक्टरची पुजा केली जाते.