चार बछड्यांच्या जन्माने सिद्धार्थ उद्यानाच्या समृद्धीत भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 06:34 PM2019-04-27T18:34:35+5:302019-04-27T18:36:07+5:30
दोन बछडे पांढरे तर दोन पिवळ्या रंगाची आहेत.
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात चार नव्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. शुक्रवारी रात्री ८ ते १२ वाजेदरम्यान वाघीण समृद्धी हिने चार बछड्यांना जन्म दिला. यात दोन बछडे पांढरे तर दोन पिवळ्या रंगाची आहेत. वाघीण आणि चारही बछड्यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांची आवश्यक ती काळजी घेत असल्याची माहिती महानगरपालिका सूत्रांनी दिली आहे.
सिद्धार्थ आणि समृद्धी या वाघांच्या जोडीपासून ही पिल्लं जन्मली आहेत. महानगरपालीकेच्या सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात १९९१ पासून आजपर्यंत वाघांच्या सहा जोड्यांनी तब्बल २६ बछड्यांना जन्म दिला. त्यातील १२ बछडे देशभरातील विविध प्राणिसंग्रहालयात पाठविण्यात आले. जागेअभावी प्राणिसंग्रहालयात आज ८ वाघ आहेत. त्यात आता आणखी चार बछड्यांची भर पडली आहे.
प्राणिसंग्रहालयात सध्या आहेत ८ वाघ
२००५ मध्ये महापालिकेने पंजाब येथून चार पिवळे वाघ आणले. त्यांची नावे छोटू, गुड्डू, दीप्ती, कमलेश अशी आहेत. त्यांच्यापासून तब्बल ११ बछडे जन्माला आले. ५ बछडे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या सूचनेनुसार देशभरातील इतर प्राणिसंग्रहालयात वर्ग करण्यात आले. तीन बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या प्राणिसंग्रहालयात ७ पिवळे वाघ आहेत. त्यात सिद्धार्थ, समृद्धी, अर्जुन, करिना, करिश्मा, शक्ती, भक्ती यांचा समावेश आहे. तर प्रमोद आणि भानुप्रिया यांच्या अपत्यापैकी एकमेव ‘वीर’ हा पांढरा वाघ येथे आहे.
फक्त केअर टेकरला परवानगी
प्राणिसंग्रहालयात यापूर्वी तब्बल ८ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे प्राणिसंग्रहालयाच्या वतीने समृद्धी आणि तिच्या बछड्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. समृद्धीसह बछड्यांना संसर्ग होऊ नये म्हणून आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. तसेच त्यांच्या जवळ केवळ केअर टेकरला जाण्यास परवानगी देण्यात आली असल्याची माहिती प्राणिसंग्रहालयाकडून देण्यात आली आहे.