चालकास मारहाण करून फिल्मीस्टाईल पळविला सळईचा ट्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 08:28 PM2018-10-06T20:28:26+5:302018-10-06T20:29:05+5:30
औरंगाबाद : जालना येथून चार लाखांच्या लोखंडी सळई घेऊन चांदवडला (जि.नाशिक) जाणाऱ्या ट्रकसमोर फिल्मीस्टाईल कार आडवी लावून सात ते ...
औरंगाबाद : जालना येथून चार लाखांच्या लोखंडी सळई घेऊन चांदवडला (जि.नाशिक) जाणाऱ्या ट्रकसमोर फिल्मीस्टाईल कार आडवी लावून सात ते आठ दरोडेखोरांनी चालकाचे अपहरण करून ट्रक पळविला. दोन्ही हात बांधलेल्या ट्रकचालकास बेदम मारहाण करून लासूर परिसरातील एका शेतात सोडून दरोडेखोर पसार झाले. जालना रोडवरील शेंद्रा शिवारात शुक्रवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी चिकलठाणा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
जुबेर अहेमद रफिक अहेमद (४७,रा. मालेगाव, जि. नाशिक) असे ट्रकचालकाचे नाव आहे. चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, जुबेर अहेमद यांनी शुक्रवारी रात्री जालना येथून ट्रान्स्पोर्टमधून सुमारे चार लाख रुपये किमतीच्या लोखंडी सळई चांदवड येथे घेऊन जात होते. रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास जालना रोडवरील शेंद्रा शिवारात ते असताना एक कार अचानक त्यांच्या ट्रकसमोर आडवी झाली. जुबेर यांनी ट्रक थांबविताच कारमधून उतरलेले ७ ते ८ जण ट्रकच्या दोन्ही बाजूने केबिनमध्ये चढले. त्यांनी जुबेर यांना बेदम मारहाण करून पैशाचे पाकीट आणि मोबाईल हिसकावला. मोबाईलमधील दोन्ही सीमकार्ड काढून परत केले आणि मोबाईल स्वत:कडे ठेवला. त्यातील काही जणांनी जुबेरचे दोन्ही हात बांधले आणि तोंडाला रूमाल बांधला. ड्रायव्हर सीटवरून बाजूला करून एका आरोपीने ट्रक तीन ते चार किलोमीटरपर्यंत चालवीत नेला. त्यानंतर आरोपींपैकी काही जण त्यांच्या कारमध्ये बसले आणि त्यांनी जुबेरलाही कारमध्ये बसविले. पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरील पेट्रोलपंपावर त्यांनी कारमध्ये इंधन भरले. त्यांनी पंपावरील कर्मचाºयांसोबतही वाद घातला. तेथून पुढे ८ ते १० किलोमीटर अंतर कापल्यानंतर आरोपींनी जुबेरला एका शेताजवळ कारमधून उतरविले आणि ते सुसाट निघून गेले. त्यानंतर सुमारे एक किलोमीटरपर्यंत पायी चालल्यानंतर जुबेर यांना एका शेतात लोक वाहनात टमाटे भरत असल्याचे दिसले. त्यांनी जुबेरचे हात सोडले आणि तोंडाला बांधलेला रूमाल काढला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना कळविली. पोलिसांनी लगेच तेथे धाव घेऊन जुबेरला लासूर स्टेशन येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. चिकलठाणा ठाण्याच्या हद्दीतील घटना असल्याने त्याच्याकडून घटनास्थळाची माहिती घेतली. गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी घटनास्थळाची पाहणी केली.