अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनावर अखेर तोडगा
By Admin | Published: August 27, 2014 01:19 AM2014-08-27T01:19:51+5:302014-08-27T01:37:03+5:30
उस्मानाबाद : अतिरिक्त शिक्षकांचे तालुकास्तरावर समयोजन झाल्यानंतरही जिल्हाभरातून तब्बल १०३ गुरूजी अतिरिक्त ठरले होते. त्यांच्या समायोजनाचा पेच निर्माण झाला होता.
उस्मानाबाद : अतिरिक्त शिक्षकांचे तालुकास्तरावर समयोजन झाल्यानंतरही जिल्हाभरातून तब्बल १०३ गुरूजी अतिरिक्त ठरले होते. त्यांच्या समायोजनाचा पेच निर्माण झाला होता. एवढया प्रमाणात जागा रिक्त नसल्याने बऱ्याचशा शिक्षकांना बाहेरच्या जिल्ह्यात जावे लागणार होते. परंतु, मुख्य कार्यकारी अधिकारी रावत यांनी यातून मार्ग काढीत संबंधित अतिरिक्त गुरूजींना पाचवी ते आठवीच्या वर्गावर नियुक्त्या दिल्या. ही प्रक्रिया मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
वर्षागणिक जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होवू लागली आहे. त्यामुळे विशेषत: मागील दोन-तीन वर्षांपासून दरवर्षी अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर बनत आहे. यंदाही जिल्ह्यात काही वेगळे चित्र नाही. अतिरिक्त गुरूजींचे तालुकास्तरावर समायोजन केल्यानंतरही १०३ च्या आसपास प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरले होते. मात्र, जिल्ह्यात एवढया प्रमाणात जागा रिक्त नव्हत्या. परिणामी बऱ्याच शिक्षकांना अन्य जिल्ह्यात जावे लागणार होते. त्यामुळे शिक्षकांमध्येही खळबळ उडाली होती. शिक्षकांना बाहेरच्या जिल्ह्यात पाठविण्यास काही शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला होता. तसेच त्यांनी शासनस्तरावर पाठपुरवाही केला होता.
दरम्यान, शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न गंभीर बनल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी यातून मार्ग काढला. जिल्हा परिषदेच्या १३८ शाळांना नव्याने आठवीचे वर्ग जोडण्यात आले आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक देण्यात आले नव्हते. काही शाळांवर पाचवी, सहावी आणि सातवीच्या वर्गांनाही पुरेशे शिक्षक नव्हते. तर दुसरीकडे अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न ‘आ’ वासून उभा होता. यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत होते. ही बाब लक्षात घेवून रावत यांनी ‘शासनाची मान्यता घेण्याच्या अधीन राहून’ उपरोक्त अतिरिक्त शिक्षकांना पाचवी ते आठवीच्या वर्गावर नियुक्ती देण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते.
त्यानुसार मंगळवारी दुपारी समायोजनाची प्रक्रिया ठेवण्यात आली होती. प्रभारी शिक्षणाधिकारी जाधव यांच्या उपस्थितीत या प्रक्रियेला सुरूवात झाल्यानंतर साडेसात वाजेच्या सुमारास १०३ प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. यामध्ये पाच ते सहा ठिकाणी पाचवीच्या वर्गाला शिक्षक देण्यात आले. तर उर्वरित गुरूजींचे नव्याने जोडण्यात आलेल्या आठवीच्या वर्गावर समायोन केले. त्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या गुरूजींचा प्रश्न तुर्तास मिटला आहे. प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनानंतर अतिरिक्त असलेल्या १५ माध्यमिक शिक्षकांचे समायोजन करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)