स्टील बॉडीच्या ‘एसटी’ने घेतला आकार; औरंगाबाद विभागातील पहिली बस लवकरच प्रवाशांच्या सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 08:32 PM2018-01-20T20:32:18+5:302018-01-20T20:33:59+5:30
एसटी महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत विभागातील पहिल्या स्टील बॉडीच्या (माईल्ड स्टी)‘एसटी’ने आकार घेतला आहे. या बसची बांधणी पूर्ण झाली असून, किरकोळ काम शिल्लक आहेत. दोन दिवसांत काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यासाठी ही बस सज्ज होईल.
औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत विभागातील पहिल्या स्टील बॉडीच्या (माईल्ड स्टी)‘एसटी’ने आकार घेतला आहे. या बसची बांधणी पूर्ण झाली असून, किरकोळ काम शिल्लक आहेत. दोन दिवसांत काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यासाठी ही बस सज्ज होईल.
आकर्षक रंगसंगतीबरोबर आरामदायक प्रवासासाठी विविध सोयीसुविधा या बसमध्ये आहेत. आरामदायक आसन व्यवस्था, चालकाजवळ माईक व स्पीकर, डिजिटल मार्ग फलक, आपत्कालीन अलार्म, मोठ्या आकाराच्या खिडक्या ही या बसची वैशिष्ट्ये आहेत. पाच महिन्यांच्या परिश्रमानंतर नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने अॅल्युमिनियमऐवजी स्टील बॉडीमध्ये बांधण्यात आलेल्या ‘एसटी’ने आकार घेतला आहे. एसटी महामंडळाच्या बसेस गेल्या अनेक वर्षांपासून अॅल्युमिनियम बांधणीतील आहेत. सुरक्षित प्रवास म्हणून एसटी महामंडळाच्या ‘लालपरी’ची ओळख आहे. ही ओळख अधिक घट्ट होण्यासाठी स्टील बॉडीच्या परिवर्तन बस बांधणीचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्टील बॉडीबरोबर बसमधील सोयीसुविधांमुळे एसटी खाजगी बसला चांगलीच टक्कर देणार आहे. कार्यशाळेत चेसीसअभावी नव्या बस बांधणीला बे्रक लागला आहे. चेसीसचा पुरवठा होत नसल्याने केवळ जुन्या एस. टी. बसची पुनर्बांधणीच सुरू आहे. जुन्या बसेस खिळखिळ्या झाल्यानंतर पुनर्बांधणी केली जाते. ही पुनर्बांधणी करतानाही यापुढे अॅल्युमिनियमऐवजी स्टीलचा वापर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आणखी बसेस बांधणार
स्टील बॉडीची बस दोन दिवसांत सज्ज होईल. काही किरकोळ कामे शिल्लक आहेत. मुंबई कार्यालयाच्या सूचनेनुसार ती प्रवाशांच्या सेवेत मार्गावर दाखल होईल. यापुढेही अशा बसेस बांधण्यात येणार आहेत. १३६ बसेस बांधण्याचे नियोजन केले आहे.
-यू. ए. काटे, व्यवस्थापक, चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळा