'लॉ' ची पदवी एक पाऊल दूर होती, तत्पूर्वी विद्यार्थिनीने संपवले जीवन
By राम शिनगारे | Published: January 18, 2023 07:30 PM2023-01-18T19:30:22+5:302023-01-18T19:30:48+5:30
कारण गुलदस्त्यात : सातारा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
औरंगाबाद : महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठात पदवीच्या पाचव्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेतल्याची घटना मंगळवारी (दि.१७) दुपारी साडेतीन वाजता उघडकीस आली आहे. या प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
युक्ती सुशिल बुजाडे (२४, रा.त्रिमृर्तीनगर,जि.चंद्रपुर, ह.मु. राष्ट्रीय विधी विद्यापिठ वस्तीगृह) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थींनीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्ती ही चार वर्षांपूर्वी विधी पदवीचे शिक्षण घेण्यासाठी औरंगाबादला आली होती. सध्या ती अंतिम वर्षाला होती. तीन महिन्यानंतर तिची परीक्षा असल्यामुळे त्याची ती तयारी करीत होती. मंगळवारी सकाळी ती विद्यापीठात गेली. तीन शिकवणी वर्गाला हजेरी लावल्यानंतर वसतिगृहातील रुमवर परतली. रूममध्ये मित्रासोबत फोनवर बोलत असल्यामुळे रूममेट खोलीबाहेर गेली. काही वेळाने परत आल्यानंतरही तिला खोलीतून बोलण्याचा आवाज आला. त्यामुळे ती परत निघून गेली.
परंतु, अर्ध्यातासाने परत आल्यावर तिला आतून आवाज येत नव्हता आणि दरवाजा वाजविल्यानंतर प्रतिसादही मिळत नव्हता. तेव्हा तिने याविषयीची माहिती वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांना दिली. त्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा युक्तीने सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास घेतल्याचे दिसून आले. युक्तीला बेशुध्द अवस्थेत बजाज रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. त्यानंतर विद्यापीठाच्या प्रशासनाने घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. युक्तीच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. या प्रकरणी अधिक तपास निरिक्षक प्रशांत पोतदार यांच्या मार्गदर्शनात उपनिरिक्षक सर्जेराव सानप करीत आहेत.