अखेर ४० व्या दिवशी बाळाला आईची कूस मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 06:59 PM2020-07-28T18:59:29+5:302020-07-28T19:02:29+5:30

समाजसेवा अधीक्षकांनी घडवली माता-पित्याची भेट

Finally, on the 40th day, the baby received its mother's love | अखेर ४० व्या दिवशी बाळाला आईची कूस मिळाली

अखेर ४० व्या दिवशी बाळाला आईची कूस मिळाली

googlenewsNext
ठळक मुद्देघाटीत नवजात शिशू विभागाने केला सांभाळ  अखेर मुलाला आईने स्वीकारले

औरंगाबाद : उत्तर प्रदेशातील कामागाराच्या गर्भवती पत्नीला कोरोनाची बाधा झाली. चाळीस दिवसांपूर्वी त्यांची प्रसूती घाटीत करण्यात आली. बाळ कमी वजनाचे असल्याने नवजात शिशू विभागात भरती करून उपचार सुरू झाले. त्या काळात बाळाची विचारपूस होत होती. महिला कोरोनामुक्त होऊन घरी परतल्यावर मात्र विचारपूस करायला पालक येत नव्हते. डॉक्टरांनाही प्रतिसाद देत नव्हते. अखेर बालकल्याण समिती व घाटीच्या समाजसेवा अधीक्षक, डॉक्टरांनी समुपदेशन केल्यावर ४० व्या दिवशी बाळाला आईची कूस मिळवून दिली. आई-वडिलांना मुलाला स्वीकारायला लावले.

घाटीच्या एनआयसीयूमध्ये कोरोनाबाधित महिलेच्या बालकावर उपचार सुरू झाले. उपचारकर्ते डॉ. अतुल लोंढे यांनी पालकांना संपर्क केला. मात्र, पालक येतच नव्हते. बाळाला डोळ्याचे व्यंग असल्याने पालकांकडून टाळाटाळ होत असल्याने वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी समाजसेवा अधीक्षक संतोष पवार यांना समन्वयाची जबाबदारी सोपवली. पवार यांनी पालकांना संपर्क केला. वेगवेगळी कारणे सांगून मुलाला नेण्याचे टाळण्यात येत होते. शेवटी बालकल्याण समितीच्या अ‍ॅड. ज्योती पत्की यांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी पुढील हस्तांतरणाच्या नियमांची माहिती देत पालकांचे समुपदेशन केले. 

समाजसेवा अधीक्षक पवार यांनी सातत्याने पाठपुरावा करून बाळाचा स्वीकार करण्याची पालकांची मानसिकता तयार केली. अखेर ४० व्या दिवशी नवजात शिशू विभागाचे प्रमुख डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, उपअधिष्ठाता डॉ. कैलास झिने यांच्या मार्गदर्शनात संतोष पवार, बालकल्याण समितीच्या मनीषा खंडागळे यांनी शनिवारी बाळाला आई-वडिलांच्या ताब्यात दिले. 

यांनी केला सांभाळ
नवजात शिशू विभागप्रमुख डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. अतुल लोंढे यांच्या मार्गदर्शनात डॉ. सोनाली, डॉ. शिल्पा, डॉ. अमित पाटील, परिसेविका टेरेसा कोर्टे, स्तवन इंगळे, प्रशांत भोसले, अनुजा लाडकत, सपना जाधव, आरती पठरे, दीपाली मुंडे, मनोरमा जाधव, शील भिवसने, पूजा गिरी आदींनी ४० दिवस बाळाचा सांभाळ केला. 

Web Title: Finally, on the 40th day, the baby received its mother's love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.