अखेर मनपाचा आकृतिबंध मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 01:18 AM2017-09-19T01:18:07+5:302017-09-19T01:18:07+5:30
मागील दीड-दोन वर्षांपासून खितपत पडलेला आकृतिबंधचा विषय सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दुरुस्तीसह मंजूर करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मागील दीड-दोन वर्षांपासून खितपत पडलेला आकृतिबंधचा विषय सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दुरुस्तीसह मंजूर करण्यात आला. आकृतिबंधमध्ये दैनिक वेतनावर काम करणारे २०४ कर्मचारी, लोकसंख्येच्या दृष्टीने मजुरांची संख्या वाढविणे, वर्ग-१ आणि वर्ग-२ मधील अधिकाºयांच्या पदांना मंजुरी घेण्याचे आश्वासन आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिले. येणाºया २५ वर्षांमध्ये मनपात भरण्यात येणाºया या पदांना आता शासनाची मंजुरी आवश्यक आहे.
सोमवारी छोट्या-मोठ्या कारणावरून सर्वसाधारण सभा तीन वेळेस तहकूब करावी लागली. दुपारी ४ वाजता सभा सुरू झाल्यावर थेट आकृतिबंधच्या मुद्यावर जोरदार चर्चा सुरू झाली. प्रारंभी राजू शिंदे यांनी सेवा भरती नियम आणि आकृतिबंध या दोन वेगवेगळ्या विषयांवर प्रस्तावाची चिरफाड केली. आकृतिबंधमध्ये असलेल्या उणिवा त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. आयुक्त डी. एम. मुगळीकर, उपायुक्त अय्युब खान यांनी प्रशासनाने हा आकृतिबंध कशासाठी तयार केला. त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात आला यावर सविस्तर विवेचन केले. वर्ग-४ आणि सफाई मजुरांची संख्या वाढवा असा आग्रह शिंदे यांनी धरला. नगरसेवक नंदू घोडेले यांनी नगररचना, विधी विभाग आदी अनेक विभागांचा यात गांभीर्याने विचार झाला नसल्याचे नमूद केले. सर्व त्रुटी दूर करण्याचे आश्वासन महापौर बापू घडामोडे यांनी दिले.
या चर्चेत नगरसेवक राज वानखेडे यांनी भाग घेत २०४ कर्मचाºयांना सेवेत कायम करण्याची मागणी लावून धरली.