अखेर अंजलीस न्याय मिळाला;५८ विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 06:34 PM2019-07-19T18:34:53+5:302019-07-19T18:50:01+5:30
कारवाई झालेले विद्यार्थी भेटल्यास न्यायासाठी प्रयत्न करणार; हरिभाऊ बागडे यांचा दिलासा
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयाने अंजली गवळी या विद्यार्थिनीने उत्तरपत्रिका फाडली नसताना कारवाई केली. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर अंजलीला न्याय देण्यात आला. याबद्दल तिचा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सत्कार केला. मात्र याच मंडळाने उत्तरपत्रिका फाडल्याच्या आरोपावरून ५८ विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. त्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधल्यास त्यांच्या न्यायासाठी प्रयत्न करील, असे स्पष्टीकरण बागडे यांनी पत्रकार परिषदेत दिले.
विभागीय शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत अंजली भाऊसाहेब गवळी ही विद्यार्थिनी श्रीमती धनालाल गंगवाल हायस्कूल कचनेर केंद्रावर परीक्षा देत होती. या परीक्षेत हिंदी विषयाच्या पेपरमध्ये तिच्या उत्तरपत्रिकेचे १७ क्रमांकाचे पान फाडल्याचे उत्तरपत्रिका तपासताना शिक्षकाच्या लक्षात आले. यामुळे अंजलीचा निकाल मंडळाने राखीव ठेवला. या प्रकरणात तिच्याकडून ‘हिंदी विषयाच्या उत्तरपत्रिकेचे पान अनवधानाने फाडले नाही’ असे मंडळाने लिहून घेतले. तिला कोणत्याही प्रकारची बाजू मांडण्याची संधी दिली नाही. त्याच वेळी तिच्यावर चालू परीक्षेची संपादवणूक रद्द करून आगामी वर्षातही परीक्षा देण्यास बंदी घालण्याचा निर्णय मंडळाने दिला होता. याविषयी अंजलीसह तिच्या वडिलांनी माहिती अधिकारात विविध कागदपत्रे मागवली असता, त्यांना मंडळाकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यामुळे त्यांनी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे धाव घेतली होती.
या प्रकरणात बागडे यांनी मंडळाच्या विभागीय कार्यालयात येऊन तीन तास ठिय्या दिला. मात्र त्यांना कोणतेही आश्वासन देण्यात आले नाही. त्यावर बागडे यांनी शालेय शिक्षणमंत्र्यांसह सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकच मुंबई लावली. या बैठकीत अंजलीच्या प्रकरणात एक सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला. त्याचा अहवाल आल्यानंतर अंजली दोषी नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर तिचा निकाल जाहीर करण्यात आला. या यशस्वी लढ्याबद्दल बागडे यांनी गुरुवारी त्यांच्या कार्यालयात अंजलीसह तिच्या आई-वडिलांचा सत्कार केला.
यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मंडळाकडून विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात असल्याचे सांगितले. उत्तरपत्रिका फाडल्याचे विद्यार्थ्यांकडून लिहून घेतले जाते. तेव्हा त्या परीक्षेत पर्यवेक्षक असलेल्या शिक्षकांची काहीच जिम्मेदारी नाही का? ते तपासून उत्तरपत्रिका घेतात? असे प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत. अंजलीच्या प्रकरणात पर्यवेक्षकांसह मंडळाचे अधिकारी दोषी असून, विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे नियम बदलण्याच्या सूचना शालेय शिक्षणमंत्र्यांना देण्यात आल्याचेही बागडे यांनी सांगितले.
६० विद्यार्थ्यांवर कारवाई कायम
अंजलीवर मंडळाने उत्तरपत्रिका फाडल्याचा आरोप ठेवून कारवाई केली होती. मात्र विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावत शालेय शिक्षण विभागाची यंत्रणा हलवली. त्यामुळे एकट्या अंजलीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात आली. मात्र त्याच वेळी उत्तरपत्रिकेचे पान फाटले, गायब झाल्याच्या प्रकारावरून दहावीच्या ४३ आणि बारावीच्या १७ विद्यार्थ्यांचा मंडळाने निकाल राखून ठेवत आगामी वर्षात परीक्षेला बंदीची कारवाई केली आहे. ४त्या प्रकरणातही थातूरमातूर चौकशी केल्याचे बागडे यांच्या लक्षात आणून दिले. तेव्हा त्यांनी उत्तरपत्रिका फाडल्यावरून कारवाई झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांनी संपर्क साधल्यास त्यास न्याय देण्यासाठी प्रयत्न करील, असे उत्तर दिले. मात्र अंजलीसोबतच या अन्याय झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे मंडळासह विधानसभा अध्यक्षांनी दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले. या ६० विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधातरीच असल्याचे स्पष्ट झाले.