अखेर औरंगाबाद मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 03:55 PM2018-03-16T15:55:22+5:302018-03-16T15:56:14+5:30
मिटमिट्यात कचरा नेण्याचे आदेश ज्या महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिले होते त्यांचीही आता बदली करण्यात आली आहे. आज सकाळी औरंगाबाद येथील वैधानिक विकास महामंडळात त्यांच्या बदली आदेश आले.
औरंगाबाद : मिटमिट्यात कचरा नेण्याचे आदेश ज्या महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिले होते त्यांचीही आता बदली करण्यात आली आहे. आज सकाळी औरंगाबाद येथील वैधानिक विकास महामंडळात त्यांच्या बदली आदेश आले. कचरा टाकण्यास विरोध करणार्या मिटमिट्यातील नागरिकांना झोडपून काढणार्या पोलिसी कारवाईचा फटका पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना याआधीच बसला आहे.
गेल्या २९ दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर कचर्याचे ढीग साचले आहेत. यावर महापालिकेच्या पदाधिकारी आणि आयुक्तांना तोडगा काढता आलेला नाही. ही समस्या जेथून सुरु झाली त्या नारेगाव येथील डेपोत कचरा टाकण्यासाठी परिसरातील नागरिकांना महापालिकेला चार महिन्यांची मुदत दिली होती. या मुदतीत महापालिकेचे आयुक्त, प्रशासन आणि पदाधिकार्यांनी कोणताही तोडगा काढला नाही. कचर्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याचे गांभीर्य महापालिकेला नव्हते. चार महिन्यांची मुदत संपताच नारेगावकरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा अंदाज येण्याइतपत वकूब महापालिका आयुक्त आणि पदाधिकार्यांकडे नसल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर मिटमिटा प्रकरणाने कचरा प्रश्न आणखीच पेटला. कचर्याची समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारने नगरविकास विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांना धाडले. त्यांनी पंचसूत्री जाहीर केली. मात्र, या पंचसूत्रीचीही अंमलबजावणी झालेली दिसत नाही. यामुळे कचर्याच्या प्रश्नाआधी आणि नंतरही महापालिका गंभीर नसल्याचे दिसले.
कचरा प्रश्न निर्माण करून हजारो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळण्याबरोबरच मिटमिट्यातील नागरिकांवर पोलिसांना बळाचा वापर करण्याची वेळ महापालिका प्रशासनानेच आणल्याचे स्पष्ट दिसत आहे. नागरिकांवर बळाचा वापर करण्याचा निषेधार्थ होता. आणि त्याचे फळ पोलीस आयुक्त यादव यांना मिळाले. याच न्यायाने कचर्याच्या या प्रश्नातून महापालिकेचे आयुक्तसुद्धा सुट शकत नव्हते.
काय आहे मिटमिटा प्रकरण
७ मार्च रोजी मिटमिट्यामध्ये महापालिका आयुक्त मुगळीकर यांच्या आदेशाने कचर्याची वाहने निघाली. नागरिकांनी काचरा टाकण्यास विरोध केला. पोलीस आणि नागरिकांमध्ये दगडफेकीच्या घटना होऊन संघर्ष निर्माण झाला. यामध्ये पोलिसांनी नागरिकांनाच बदडून काढले. याचे पडसाद विधिमंडळात उमटले. अधिवेशन चालू असताना लोकप्रतिनिधींनी मिटमिट्यातील अत्याचाराकडे लक्ष वेधले. यावर काल मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा विधानसभेत केली. यानंतर या प्राश्वभूमिवर आज मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांची बदली झाली.