अखेर औरंगाबादकरांना मिळाली ‘5G’ ची महागती;जिओने घेतली आघाडी, एअरटेलचे परीक्षण सुरू

By प्रशांत तेलवाडकर | Published: February 22, 2023 03:20 PM2023-02-22T15:20:40+5:302023-02-22T15:22:11+5:30

जिओ कंपनीने 5G इंटरनेट सेवा औरंगाबादमधील २० भागांत सुरू केली आहे.

Finally Aurangabadkars got the '5G' internet speed; Jio took the lead, Airtel's review begins | अखेर औरंगाबादकरांना मिळाली ‘5G’ ची महागती;जिओने घेतली आघाडी, एअरटेलचे परीक्षण सुरू

अखेर औरंगाबादकरांना मिळाली ‘5G’ ची महागती;जिओने घेतली आघाडी, एअरटेलचे परीक्षण सुरू

googlenewsNext

- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद :
माहिती, मनोरंजन, शैक्षणिक, उद्योग, व्यापार क्षेत्रात क्रांती घडविणारी ‘5G’ इंटरनेट सेवा बहुप्रतीक्षेनंतर अखेर औरंगाबादेत सुरू झाली आहे. यामुळे पर्यटनाची राजधानी, ऑटोमोबाइल हब असलेल्या शहराला ‘5G’ची गती मिळाली आहे. विशेष म्हणजे, जी-२० चे शिष्टमंडळ दाखल होण्याआधीच इंटरनेटचा वेग वाढला आहे.

मागील वर्षीच्या अखेरीस औरंगाबाद दौऱ्यावर आलेले केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री आश्विनी वैष्णव यांनी शहरवासीयांना ‘गुड न्यूज’ दिली होती. ३१ मार्च २०२३ पर्यंत शहरामध्ये फाइव्ह-जी सेवा देण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले होते. या तारखेच्या आधीच जिओने 5G इंटरनेट सेवा देणे सुरू केले आहे. 5G मोबाइल हँडसेटवर 5G चे सिग्नल मिळू लागताच नेट युजर्समध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. औरंगाबादेत ही सेवा सुरू करणारी जिओ पहिली कंपनी ठरली आहे. एअरटेलने शहरात ४ ठिकाणी परीक्षण सुरू केले आहे. येत्या महिनाभरात एअरटेलचे शहरात नेटवर्क सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.

5G सेवा शहरातील २० भागांत
जिओ कंपनीने 5G इंटरनेट सेवा शहरातील २० भागांत सुरू केली आहे. यात नाथ व्हॅली रोड, सुंदरनगर, रामगोपालनगर (पडेगाव), बँक कॉलनी, देवळाई, पुंडलिकनगर, सातारा परिसर, श्रीनिवास कॉलनी (बीड बायपास रोड), कमलनयन बजाज हॉस्पिटल परिसर, सिडको वाळूज महानगर-१ व वाळूज महानगर-२, टीव्ही सेंटर (हडको), एमजीएम हॉस्पिटल परिसर, चिकलठाणा विमानतळ परिसर, सिल्कमिल्क परिसर, संदेशनगर या भागात सध्या 5G सेवा प्रदान करण्यात आली आहे. एअरटेल सिडको कॅनॉट प्लेस, गजानन महाराज मंदिर रोड परिसर, चिकलठाणा विमानतळ परिसरात परीक्षण करत आहे.

२ सेकंदांत होईल चित्रपट डाऊनलोड
कंपन्यांनी केलेल्या दाव्यानुसार 5G इंटरनेटमुळे १ जीबीपीएस रॉकेटसारखी स्पीड मिळत आहे. याद्वारे २ ते ४ सेकंदांत 5GB चा चित्रपट डाऊनलोड होईल. तसेच १३८ एमबीपीएस अपलोडिंग स्पीड मिळणार आहे.

मोबाइल हँडसेट बाजार
१) दररोज 5G च्या ५०० हँडसेटची विक्री
२) शहरात २५० लहान-मोठे मोबाइल हँडसेट विक्रेते आहेत.
३) ८ प्रमुख कंपन्यांचे 5G चे २५ मोबाइल मॉडेल उपलब्ध आहेत.
४) 5G हेंडसेटची किंमत १५ हजार ते दीड लाख रुपयांदरम्यान आहे.

३० हजारांपर्यंतचे विकतात ८० टक्के हँडसेट
मागील दिवाळीपासूनच शहरवासीयांनी 5G हँडसेट खरेदी करणे सुरू केले आहे. २० हजार ते ३० हजार रुपयांदरम्यानचे ८० टक्के हँडसेट विकतात. ही सेवा सुरू झाल्याने हँडसेट विक्री दुपटीने वाढेल.
- ज्ञानेश्वर खर्डे, उपाध्यक्ष, ऑल इंडिया मोबाइल असोसिएशन

Web Title: Finally Aurangabadkars got the '5G' internet speed; Jio took the lead, Airtel's review begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.