अखेर ‘बार्टी’ने रद्द केली शौर्य दिनाच्या कार्यक्रमाच्या भोजन व्यवस्थेची निविदा
By विजय सरवदे | Published: December 15, 2023 06:36 PM2023-12-15T18:36:01+5:302023-12-15T18:36:53+5:30
‘बार्टी’ने भोजन पुरवठ्यावर खर्च न करता तो विद्यार्थ्यांच्या फेलोशिप, प्रशिक्षण व अन्य उपक्रमांवर करावा, अशी मागणी परिवर्तनवादी चळवळीतून होत होती
छत्रपती संभाजीनगर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘बार्टी’ संस्था अस्तित्वात आली आहे. मात्र, या संस्थेने १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे आयोजित शौर्य दिनाच्या कार्यक्रमास येणाऱ्या नागरिकांसाठी भोजन पुरवठ्याची ६० लाखांची निविदा प्रसिद्ध केली. त्यास परिवर्तनवादी चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी हरकत घेत हे काम ‘बार्टी’ नव्हे, ते शासनाने करावे, असा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी सायंकाळी ‘बार्टी’ने भोजन पुरवठ्याची प्रसिद्ध निविदा रद्द केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात ‘बार्टी’ने १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास देशभरातून उपस्थित राहणाऱ्या ५० हजार नागरिकांना भोजन देण्यासाठी ६० लाखांची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यास फुले- शाहू- आंबेडकर विचारांच्या परिवर्तनवादी चळवळीचे राहुल मकासरे यांनी आक्षेप घेतला होता.
या कार्यक्रमाच्या ठिकाणी शौर्य दिनानिमित्त विविध पक्ष- संघटना, संस्थांच्या वतीने नागरिकांसाठी भोजन, पाणी, चहा, अल्पोपाहाराची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे ‘बार्टी’ने भोजन पुरवठ्यावर खर्च न करता तो विद्यार्थ्यांच्या फेलोशिप, प्रशिक्षण व अन्य उपक्रमांवर करावा, अशी मागणी समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे यांनी भोजन पुरवठ्यासंबंधीची प्रसिद्ध केलेली ई- निविदा १३ डिसेंबर रोजी रद्द केली.