अखेर पैठण नगर पालिकेचे व्यापारी संकुल जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 07:02 PM2021-08-26T19:02:52+5:302021-08-26T19:06:17+5:30
यात्रा मैदान परिसरात नगर परिषदेने बांधलेल्या व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांना नगर परिषद प्रशासनाने गाळे खाली करण्याची बुधवारी २४ तासाची नोटीस दिली होती.
पैठण ( औरंगाबाद ) : नाथ मंदिरालगत यात्रा मैदानासाठी आरक्षित असलेल्या ( आरक्षण क्र २९) या क्षेत्रावर ठराव मंजूर करुन पैठण नगर परिषदेने बांधलेल्या व्यापारी संकुलाचे बांधकाम आज जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आले. बांधकाम पडत असताना व्यापारी हात जोडून प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर विनवणी करत धाय मोकलून रडत असल्याचे विदारक चित्र यावेळी दिसून आले.
यात्रा मैदान परिसरात नगर परिषदेने बांधलेल्या व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांना नगर परिषद प्रशासनाने गाळे खाली करण्याची बुधवारी २४ तासाची नोटीस दिली होती. गुरुवारी उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, आयपीएस अधिकारी गोरख भामरे, पोलीस निरीक्षक किशोर पवार, यांच्यासह पोलीस पथक, नगर परिषदेचे पथक पोकलँड व जेसीबी घेऊन व्यापारी संकुल पाडण्यासाठी हजर झाले. यावेळी व्यापाऱ्यांनी संकुल पाडण्यास विरोध केला. परंतु, प्रशासकीय अधिकारी काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलीस बंदोबस्त लावून व्यापारी संकुलाचे रस्ते बंद करून दुपारी तीन वाजेस चार जेसीबी व एक पोकलेन लावून ४२ गाळे पाडण्याची कारवाई करण्यात आली.
आरक्षित जागेच्या १५ % क्षेत्रावर वाणिज्य विकास कामास नगरविकास विभागाने दिलेल्या परवानगीनुसार नाथ मंदीर परिसरात व्यापाऱ्यांना व्यावसायिक गाळे बांधून देण्याचा ठराव नगर परिषदेने मंजूर केला होता. यानुसार नाथ मंदीर परिसरात व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम उभे केले होते. याबाबत पैठण येथील रमेश लिंबोरे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या बाबत कारवाई करण्याचे आदेश २०१६ मध्ये जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना दिले होते. परंतु या बाबत कारवाई झालेली नव्हती. दरम्यान, रमेश लिंबोरे यांनी ३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना निवेदन देऊन या बाबत कारवाई करण्याची विनंती केली होती. या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी मुख्याधिकारी पैठण यांना यात्रा मैदानातील न.भू.क्र . १०५१. १०५३. १०५४ , १०५६ व १०५७ या जागेवरील व्यापारी संकुलाचे बांधकाम निष्काषीत करण्याचे आदेश दिले होते.
यानुसार आज मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून अखेर व्यापारी संकुल जमीनदोस्त करण्यात आले. व्यापारी संकुलाचे बांधकाम पाडू नये म्हणून गुरूवारी नगरसेवक दत्ता गोर्डे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली तिकडे न्यायालयात सुनावणी सुरू असताना ईकडे मात्र व्यापारी संकुल पाडण्याची कारवाई सुरू होती.
१ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान अतिक्रमण काढू नका, नगर विकास विभागाचे पत्रक
दि २९ जून, २०२१ रोजी नगर विकास विभागाचे उपसचिव शंकर जाधव यांनी परिपत्रक काढून १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान पावसाळी वातावरण लक्षात घेता शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी जमिनीवरील अनधिकृत झोपडपट्टी व अन्य बांधकामे निष्काषीत करू नये अशा सूचना दिल्या मात्र या परिपत्रकाकडे दुर्लक्ष करीत आज प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची कारवाई पूर्ण केली. दरम्यान या कारवाईसाठी प्रशासनावर मोठा दबाव असून स्थानिक राजकारणातून आजची कारवाई झाल्याची चर्चा पैठण शहरात होत आहे.
अनेकांचे संसार उघड्यावर....
व्यापारी संकुलातील गाळ्यात काहीजणांनी दुकानासोबतच घरोबा केला होता. आजच्या कारवाईने त्यांचे संसार उघड्यावर आल्याने त्यांच्या डोळ्यातील अश्रू गोठून गेले होते.