अखेर ठरलं; छत्रपती संभाजीनगरात होणार ग्लो गार्डन, टीव्ही सेंटरची जागा फिक्स

By मुजीब देवणीकर | Published: December 28, 2023 11:43 AM2023-12-28T11:43:00+5:302023-12-28T11:45:01+5:30

स्वामी विवेकानंद उद्यानाच्या पाठीमागील जागेची निवड

Finally decided; Glow Garden to be done in Chhatrapati Sambhajinagar, location of TV center fixed | अखेर ठरलं; छत्रपती संभाजीनगरात होणार ग्लो गार्डन, टीव्ही सेंटरची जागा फिक्स

अखेर ठरलं; छत्रपती संभाजीनगरात होणार ग्लो गार्डन, टीव्ही सेंटरची जागा फिक्स

छत्रपती संभाजीनगर : पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरात पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या अनेक गोष्टी नाहीत. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून शहरात ग्लो गार्डन उभारण्याचा विचार सुरू होता. अखेर टीव्ही सेंटर भागातील स्वामी विवेकानंद उद्यानाच्या पाठीमागील २ एकर जागेवर गार्डन विकसित करण्याचे निश्चित झाले. सीएसआर निधीतून नवी दिल्ली येथील बीईसीआयएल कंपनीने पुढाकार घेतल्याची माहिती मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली. लवकरच हे काम सुरू होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रशासक जी. श्रीकांत यांनी मागील आठ महिन्यांपासून मुख्य प्रकल्पांवर अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. शहर म्हणून नागरिकांना कोणत्या दर्जेदार सोयीसुविधा द्यायला हव्यात, पर्यटकांसाठी शहर नंदनवन कसे ठरेल, यावर भर दिला जात आहे. दुबईच्या ग्लो-गार्डनमध्ये जगातील अद्वितीय कला, संकल्पना यांचे कौशल्यपूर्ण मिश्रण साकारण्यात आले आहे. या ग्लो-पार्कमध्ये लहान-मोठी ग्लो-इन डार्क उद्याने विकसित केलेली आहेत. ऊर्जेची बचत करणारे एलईडी दिवे, चमकदार फॅब्रिकच्या मदतीने हे पार्क उभारले आहे. याच धर्तीवर शहरातील टीव्ही सेंटर येथील स्वामी विवेकानंद उद्यान परिसरात ग्लो-गार्डन विकसित केले जाणार आहे.

प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले की, ग्लो-गार्डनसाठी पॉवर फायनान्स काॅर्पोरेशन लि.च्या सीएसआर निधीतून नवी दिल्ली येथील बीईसीआयएल कंपनी ग्लो-गार्डन तयार करून देणार आहे. १० कोटी रुपये खर्च करून दोन एकर जागेमध्ये ग्लो-गार्डन विकसित होईल. मनपा वीज, पाणी आणि जमीन उपलब्ध करून देईल. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कंपनीसोबत सामंजस्य करार करून भूमिपूजन केले जाईल.

पर्यटक केंद्रबिंदू
स्वामी विवेकानंद उद्यानालगत उभारण्यात येणारे ग्लो-गार्डन पर्यटकांना आकर्षित करेल, अशी अपेक्षा आहे. रंगीबेरंगी एलईडी दिवे वापरून प्राणी, फुले, झाडे, कारंजे, सेल्फी पॉइंट तयार केले जाणार आहेत. हा प्रकल्प विकसित झाल्यानंतर शहरातील पर्यटकांची संख्या वाढेल, रात्री पर्यटक मोठ्या प्रमाणात थांबतील, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Finally decided; Glow Garden to be done in Chhatrapati Sambhajinagar, location of TV center fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.