अखेर ठरलं..! पार्किंगसाठी 'या' ७ ठिकाणी नक्की मिळणार जागा; लवकरच संपूर्ण शहरात झोन निश्चिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 02:19 PM2022-05-28T14:19:11+5:302022-05-28T14:20:10+5:30
पुण्यातील मेट्रोची पार्किंग सांभाळण्याचा अनुभव असलेल्या कार्बलेट पार्किंग ॲण्ड सर्व्हिसेसला काम देण्याचा निर्णय झाला.
औरंगाबाद : शहराला प्रामुख्याने मागील काही वर्षांपासून पार्किंगचा प्रश्न भेडसावत आहे. महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासन पार्किंगचे धोरण निश्चित करण्यासाठी प्रयत्न करीत होते. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, शहरात प्रयोगिक तत्वावर ७ ठिकाणी पार्किंग सुरू करण्यात येणार आहेत. नागरिकांना सवय लागावी म्हणून सुरुवातीचे दोन महिने पार्किंग मोफत राहणार आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी वाहने उभी करण्यात येतात. त्यामुळे दुचाकी, चार चाकी वाहनधारकांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. महापालिकेकडून पार्किंग झोनच निश्चित करण्यात आले नव्हते, त्यामुळे वाहतूक पोलिसांना कारवाईही करता येत नव्हती. शहरात कुठेही नो पार्किंगचे बोर्ड, वन-वे बोर्ड नाहीत. महाराष्ट्र शासनाने पार्किंगचे धोरण निश्चित करण्याचे आदेश महापालिकेला दिले. मागील काही वर्षांपासून बैठकांवर बैठकाच घेण्यात येत होत्या, धोरण काही निश्चित होतच नव्हते. प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दोन वर्षांपासून पार्किंगच्या विषयावर काम सुरू केले. उपायुक्त अपर्णा थेटे आणि स्मार्ट सिटीच्या टीमला जबाबदारी सोपविली होती. अखेर दोन दिवसांपूर्वी महापालिकेचे धोरण निश्चत झाले.
पुण्याच्या संस्थेला काम
पुण्यातील मेट्रोची पार्किंग सांभाळण्याचा अनुभव असलेल्या कार्बलेट पार्किंग ॲण्ड सर्व्हिसेसला काम देण्याचा निर्णय झाला. महापालिका लवकरच संबंधित संस्थेसोबत करार करणार आहे. पहिल्या टप्प्यात संस्थेची नेमणूक फक्त २४ महिन्यांसाठी करण्यात येणार आहे. काम चांगले असेल तर करार वाढवून दिला जाणार आहे.
संपूर्ण जबाबदारी संस्थेची
पार्किंग झोन, नो पार्किंग, फ्री पार्किंग झोन असे प्रकार यामध्ये असतील. ठिकठिकाणी साईन बोर्ड लावणे, वेब ॲप तयार करणे, नागरिकांकडून पैसे वसूल करणे आदी कामे खासगी संस्थेकडे असतील. प्रारंभीचे दोन महिने पार्किंग फ्री राहील. नंतर ३० टक्के रक्कम संस्थेने स्वत:कडे ठेवावी, उर्वरित ७० टक्के मनपाला द्यावी.
दुसरा टप्पाही लवकरच
महापालिका शहागंज, औरंगपुरा, पैठणगेट आदी भागांत दुसऱ्या टप्प्यात पार्किंग सुरू करणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शहरातील विविध भागांत पार्किंग झोन तयार केले जाणार आहेत.